Last Updated on 13 Dec 2023 12:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ऐकुन नक्कीच थोडस विचित्र वाटेल,पण आज जागतिक माकड दिन आहे. 2000 सालापासून 14 डिसेंबर हा दिवस जागतिक माकड दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.जरी हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे घोषित केला नसला तरी अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.माणसाची उत्क्रांती ही माकडा पासूनच झाली आहे.आश्मयुगात असलेले आदिमानव हे माकडासारखेच जंगलात राहायचे,कंदमुळं खायचे हे आपण इतिहासात शिकलो आहोत.साधारण माकडाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात प्राचीन माकड येतात,जे प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात येतात.तर दुसऱ्या प्रकारातील माकड ही अमेरीकेतील नवीन प्रकारची माकड म्हणून ओळखली जातात.माकड हा मानवी शरीराच्या ठेवणीच्या अगदी जवळ जाणारा असा प्राणी आहे,जाणून घेऊयात माकडा विषयी काही खास माहिती.
जागतिक माकड दिवस (मंकी डे) सुरू करण्याचे सर्व श्रेय केसी सॉरो आणि एरिक मिलिकिन यांना जाते.त्यांनीच या दिवसाची सुरुवात केली जेणेकरून लोकांच्या मनात प्राण्यांबद्दल प्रेम जागृत व्हावे आणि लोकांना या प्रजातीबद्दल माहिती व्हावी.माकड दिवस हा आंतरराष्ट्रीय माकड दिवस म्हणूनही ओळखला जातो.हा दिवस सन 2000 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली.
माणूस आणि माकडातील साम्य
- माणसाप्रमाणेच माकडाला देखील 32 दात असतात.तसेच माकड आणि माणसाचा डीएनए मध्ये 98 टक्के इतके साम्य असते.
- संशोधनानुसार सगळ्यात जास्त माकडांच्या प्रजाती ब्राझील या देशात आढळुन येतात.आतापर्यंत माकडाच्या 264 प्रजातींचा शोध लागला आहे.
- फळे, फुले या व्यतीरिक्त किडे काही सरपटणारे प्राणी माकड खातात.(एखाद्या पर्यटन स्थळी केळे किंवा तुमच्या जवळ असलेले पदार्थ घेण्यासाठी माकडाने लोकांना हैराण केलेले तुम्ही बघीतलेच असेल.) तसेच मानवी अन्न सुद्धा खाणे माकड पसंद करतात.
- ज्याप्रमाणे माणसाला कावीळ,टीबी यांसारखे आजार होतात,तसेच माकडाला देखील हे आजार होतात.
- माणसाप्रमाणेच माकड हा देखील समुहात राहणारा प्राणी आहे.आपल्यावर एखाद्या प्राण्याने हल्ला करु नये म्हणून संरक्षणासाठी माकड समुहात राहते.
माकडाची काही वैशिष्ट्ये
माकडाचा आयक्यु (IQ) 174 इतका असतो.संवाद साधण्यासाठी माकड चेहऱ्यावर हावभाव,वेगवेगळ्या हालचाली,वेगवेगळ्या आवाजाच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधतात.HOWLER जातीच्या माकडाचा आवाज साधारण पाच किलोमिटर अंतरापर्यंत ऐकु येतो.मादी माकड साधारण 5 ते 8 महिने बाळाला पोटात ठेवते आणि मग जन्म देते.अंतराळात सगळ्यात आधी जाणारा प्राणी हा माकडच आहे. 1949 साल अंतराळात सोडण्यात आलेल्या यानात माकडाला बसवण्यात आले.यावेळी पृथ्वी पासून 133 किलोमिटरचा प्रवास माकडाने केला. माकडाचे आयुष्य हे साधारण 20 ते 30 वर्षे इतके असते.माकड हा झाडावर वास्तव्य करणारा प्राणी आहे.तसेच दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो नेहमी समुहात राहतो.
हा दिवस कसा साजरा केला जातो?
जगभरातील अनेक प्राणीसंग्रहालयांमध्ये वार्षिक माकड डे कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात.काही देशांमध्ये, जागरूकता पसरवण्यासाठी माकड डे वर कला प्रदर्शन आयोजित केले जातात. या दिवशी, एस्टोनिया या युरोपियन देशातील टॅलिन प्राणीसंग्रहालयात चिंपांझींनी बनवलेल्या चित्रांची विक्री केली जाते. भारतातील इंदिरा गांधी प्राणी उद्यानात या दिवशी मुलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये त्यांना जंगल आणि वन्य प्राण्यांची माहिती दिली जाते.
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे.)












































































