Last Updated on 07 Nov 2024 5:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विनोद मोहिते : अधोरेखित
सांगली । इस्लामपूर मतदार संघातील उमेदवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकत्रित मोट बांधली गेल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. सर्व पारंपरिक विरोधक एकाच व्यासपीठावर येत निवडणूक प्रचारात दाखल होत आहेत. गुरुवारी खा. श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर येथे निशिकांत पाटील यांच्यासह सर्व जयंत पाटील पारंपरिक विरोधकांना बोलावून बैठक घेतली आहे. त्यात सर्वांनी जुने मतभेद विसरून जयंत पाटील यांना रोखण्याचे ठरले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी पुढाकार घेत निशिकांत पाटील यांना विजयी करण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात घेरण्यासाठी रणनीती आखली आहे. मंगळवारी जयंत पाटील यांच्या सर्व पारंपरिक विरोधकांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संवाद साधला आहे.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विरोधात एकास एक लढत करण्याचे विरोधकांना पहिले यश मिळाले आहे.
जयंत पाटील यांचे विरोधक विधानसभा निवडणुकीत कधीही एकत्रीत येत नाही असा गेल्या ३५ वर्षांचा अनुभव आहे. यंदा प्रथमच एकास एक लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अजित पवार यांचे उमेदवार म्हणून निशिकांत पाटील यांना बळ दिले जाणार आहे. अर्ज भरतांना स्वतः अजित पवारांनी उपस्थिती दर्शवली होती.आणि थेट जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता सर्व विरोधक प्रत्यक्षात प्रचारात उतरणार असल्याने प्रचाराला गती येणार आहे.
सध्या निशिकांत पाटील यांच्यासोबत आ. सदाभाऊ खोत हे प्रचारात आहेत. आता जयंत पाटील यांचे पारंपारिक विरोधी गट असणारे वैभव व गौरव नायकवडी, राहुल व सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार त्याचबरोबर इतर सर्व विरोधी छोटे-मोठे गट याची एकत्रितरित्या मोट बांधली गेली आहे.
विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना धडा शिकवायचा यासाठी मंगळवारी कोल्हापूर येथे आलेल्या महायुतीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्यात खलबते झाल्याचे वृत्त आहे. आतां सर्वांनी एकत्रित रित्या कामाला लागावे असा आदेश दिला आहे. याची जबाबदारी खा. धैर्यशील माने यांना दिली आहे. त्यांनी सर्व विरोधी गटांशी संवाद साधला आहे.खा.धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने हे विरोधी गटाचे नेते व कार्यकर्ते जयंत पाटील यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.

अर्ज माघारी नंतर आता एकाच एक लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात वेळा विधानसभेत गेलेल्या जयंत पाटील यांना प्रथमच विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुका एकास एक कधीही झाल्या नव्हत्या.
यंदा प्रथमच एकास एक लढत होत असल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे.अर्ज भरण्यासाठी येत निशिकांत दादांच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहिली सभा घेत जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोड मिळणार आहे. निशिकांत पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते.इस्लामपूर मतदार संघ यापूर्वी शिवसेनेकडे होता. तो राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी मिळवला आहे. त्यांच्या घड्याळ चिन्हावर निशिकांत पाटील निवडणूक लढवत आहेत.निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या सर्वांना व जयंत पाटील विरोधी सर्व गट एकत्रित येत आल्याने विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांची डोकेदुखी ठरणार का? हे येणारा काळ ठरवेल.












































































