Last Updated on 16 Feb 2022 8:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांचा बुधवारी (१६ फेब्रुवारी) वाढदिवस.त्या निमित्ताने…
वसंतदादांच्यानंतर सांगली जिल्हयाच्या राजकारणावर निर्वीवाद वर्चस्व आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना यश आले आहे. दादांच्या काळातील सांगली हे निर्णय प्रक्रियेचे केंद्र आता जयंत पाटील यांच्या रूपाने इस्लामपूरला आले आहे.साठीत पदार्पण करणाऱ्या जयंत पाटील यांनी अविरत कष्टाने ही वाटचाल पूर्ण केली आहे.स्वतःची नवी जयंतनिती विकसित केली आहे.
1962 ला राजारामबापू विधानसभेत निवडून गेले. यावेळी जन्म झालेल्या जयंत पाटील यांचे नाव त्यामुळेच जयंत ठेवण्यात आले. 1984 ला बापूंचे निधन होईपर्यंत जयंत पाटील यांचा राजकारणाशी संबंध नव्हता. उलट त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून उत्तम बांधकाम व्यावसायिक व्हायचे होते. पदव्युत्तर शिक्षणासाठी जयंत पाटील अमेरिकेलाही गेले होते. मात्र बापूंच्या अचानक जाण्यामुळे जयंत पाटलांच्या जगण्याचे संदर्भ बदलले.बापूंचा मोठा मुलगा म्हणून जयंत पाटील यांचे मोठे बंधू भगतदादा यांनीच राजकारणात यावे असा बापूप्रेमी कार्यकर्त्यांचा आग्रह होता.मात्र भगतदादांनी जयंत पाटील यांना राजकारणासाठी पुढे चाल दिली.सात वेळा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जयंत पाटील यांनी अनेकवेळा विजयानंतर वाळवा तालुक्यातील सभांतून त्यांच्या राजकारण प्रवेशाचा हा किस्सा सांगितला आहे.
बापूंच्या निधनावेळी बापू जनता पक्षात होते.जयंतरावांनी सार्वजनिक जीवनाला सुरवात करताना राजकीय पक्षाऐवजी नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजारामबापू कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले.सुरवातीला बापूंच्या आकस्मिक निधनामुळे जयंतराव खचून गेले होते.मला इस्लामपूरातील अंबाबाई मंदिरातील कार्यकर्त्यांची एक बैठक आठवते.जयंतराव बोलायला उभे राहिले.‘बापू’ एवढा एकच शब्द बोलले आणि त्यांना रडू कोसळले.पण जिद्दी जयंतराव हळूहळू सावरले.वाळवा तालुक्यातील जमीन सिचंनाखाली आणण्यासाठी राजारामबापूंनी 50 हजार एकर क्षेत्राचे पाणी परवाने घेतले होते.जयंतरावांनी या उपसा जलसिचंन योजना कार्यान्वित करण्यासाठी मेहनत घेतली. बॅंक, कारखाना व उपसा जलसिंचन योजना यांचे त्रिपक्षीय करार करून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हिरवाई आणली.सुरवातीच्या काळात कुठल्याही पक्षात न जाता कार्यकत्र्यांचे संघटन,बापूंच्या संस्था सक्षम करणे यावर भर दिला.सुरवातीच्या काळात बापूंच्या पराभव करण्यास कारणीभूत असलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर भर असे.पण नंतर हे स्वरूप बदलून जयंतरावांनी बेरजेच्या राजकारणाला सुरवात केली.एकत्र आल्याशिवाय विकास नाही हे सूत्र स्वीकारून वाळवा तालुक्यातील विरोधकांना मित्र करायला सुरवात केली.गरज आणि बेरीज यांचा ताळमेळ घालीत विलासराव शिंदे यांचा गट आपल्याबरोबर राहील अशी व्यवस्था केली.
इस्लामपूर नगरपालिकेत आपल्या गटामार्फत तर आष्टा येथे शिंदे गटाशी एकत्रीकरण करत मतदारसंघातील इस्लामपूर व आष्टा या दोन महत्वाच्या शहरावर आपले वर्चस्व राखले.नजीकच्या शिराळा मतदारसंघात आधी शिवाजीराव नाईक व नंतर मानसिंगराव नाईक यांना साथ दिली.बापूंच्या नंतर सुरवातीला काही काळ वसंतदादा यांच्याशीही सहकार्य केले.वाळवा विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली की,जयंतरावांचा गट जिंकणार असे चित्र निर्माण करण्यात यश आले.वाळवा तालुक्यात प्रभावी विरोधक होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.प्रश्नावर लढणारे ज्येष्ठ नेते नागनाथ नायकवडी,एन.डी.पाटील यांच्याशी थेट संघर्ष टाळला.अन्य नेत्यांच्या सहकारी संस्थातील निवडणुकांबद्दल सुरक्षित अंतर ठेवले.सुरवातील वाळवा,शिराळा या आपल्या होमग्राऊंडवर कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण करण्यावर भर दिला.वाळव्यातील निर्णायक वर्चस्वामुळे हळूहळू जयंतराव जिल्हा स्तरावरील दखलपात्र नेते बनले.
अर्थात जयंतरावांचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला तो राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर! कॉँग्रेसपक्ष सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयही जयंतरावांची कसोटी होती.पूर्वी राजारामबापूंचा पराभव होण्यामागचे एक प्रमुख कारण त्यांचे पक्षांतर होते.त्यामुळे जयंतराव खूप सावध होते.त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठका घेतल्या.निर्णय सर्वसमावेशक बनवून आपल्याबरोबर जिल्हयातील विष्णूआण्णांचा गट राहील याची काळजी घेतली.तालुक्यात पर्यायी गट उभा राहू नये म्हणून विलासराव शिंदे यांच्याबरोबर मनोमीलन घडवून आणले.राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्हा स्तरावरील नेतृत्वाला गती आली.त्यांना 17 वर्षे कॅबीनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले.राजारामबापू यांना मानणारे जिल्हाभरातील नेते,कार्यकर्ते जयंतरावांच्या तंबूत आले.राष्ट्रवादीचे दुसरे प्रभावी नेते आर. आर. पाटील (आबा) यांच्याशी त्यांचा छुपा तर कॉँग्रेसचे मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्याशी त्यांचा उघड संघर्ष राहिला.
प्रत्येक तालुक्यातील प्रमुख स्पर्धक नेत्याचे विरोधक जयंतरावांच्या संपर्कात असतात.सांगली जिल्हा परिषद,महानगरपालिका,जिल्हा मध्यवर्ती बॅंक येथे जयंतरावांचे वर्चस्व निर्माण झाले.विरोधी गटांशी संधान या प्रक्रियेमुळे जेजेपी (जयंत जनता पार्टी) असा शब्द देखील रूढ झाला होता.नेते व गटांचे ध्रुवीकरण या प्रक्रियेत अधूनमधून भाजपचे आव्हान देखील निर्माण झाले.सध्या सांगली जिल्हयातील कोणत्याही मतदारसंघात निवडणूकीत जयंतरावांचे समर्थन अथवा छुपा पाठिंबा कोणाला हे समीकरण कायम चर्चेत असते.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना जयंतरावांनी मतदारसंघाला अभिमान वाटेल अशी विकासकामे पूर्ण केली आहेत.मंत्रीपदाचा वापर करून निधी खेचून आणण्यात आणि आपले विरोधकांची एकजूट न होण्यात जयंतराव पटाईत आहेत. 2016 चा अपवाद वगळता इस्लामपूर शहरात जयंतरावांचे समर्थकच सत्तेत आहेत.
सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक,सांगली महानगरपालिका येथे राष्ट्रवादी सत्तेत आहे.सहकारी कारखान्याची शाखा काढून दाखवण्याची किमया त्यांनी साधली आहे.सहकारी साखर कारखानदारीवर त्यांचे जिल्हाभर वर्चस्व आहे.लोकानुयायी निर्णय न घेता आर्थिक परिस्थितीवर आधारित निर्णय घेत राहिल्यामुळे ते सक्षम कारखानदार आहेत.सांगली जिल्हयातील कारखानादारीवरील वर्चस्वाबरोबर नजीकच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणूकात देखील त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्वाची असते.कृष्णेच्या निवडणूकीत लढत दुरूंगी असो अथवा तिरंगी असो प्रचारात जयंत पाटील यांच्या नावाचा वापर सर्व गटांना करावा लागतो.
आज सांगली जिल्हयाच्या राजकारणात सुरवातीला मंत्री झाल्यानंतर जयंत पाटील व आर. आर. पाटील यांच्या नावाला जे वलय होते त्यात आता बदल झाला आहे.जयंतराव प्रस्थापित नेते झाले आहेत.या प्रस्थापित होण्यामुळे अनेकवेळा थोडीशी पिछेहाटही सहन करावी लागली आहे.खास करून वाळवा शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकात स्थानिक गटातील राजकारणामुळे सत्ता राखण्यात यश आले असले तरी विरोधकांना देखील दखलपात्र यश मिळाले आहे.जयंतराव प्रस्थापित असल्यामुळे काहीवेळा विरोधकांना स्पेस (अवकाश) मिळाला आहे.जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर टिकेची झोड उठवत विरोधकांनी आपले अस्तित्व राखले आहे.जयंत पाटील गटात कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि गर्दी लक्षणीय आहे.या गर्दीची गुणवत्ता वाढवणे हे समस्या सुरवातीपासून आजही टिकून आहे.या धामधुमीत अनेकवेळा सोयीसाठी जवळ केलेला गटच आव्हान देण्याची उदाहरणे देखील घडली आहेत.विरोधकांकडे मंत्रीपद असले की ते देखील जयंत पाटील यांच्या विरोधात ताकदीने उभा राहू शकतात हे सिध्द झाले आहे.
सभ्य व सुसंस्कृत नेता ही आपली इमेज प्रतिमा जपण्यासाठी जयंतराव नेहमी दक्ष असतात.मतदारसंघात जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान,ऊस,दूधासाठी उपक्रमशील कार्यक्रम यांत सातत्य आहे.मंत्रीपदाच्या कालावधीत अनेक प्रशासकीय इमारती,नाटयगृह,पाणीपुरवठा योजना,नाना पाटील स्मारक, उद्याने अशी कामे उभारली जिल्हाभरात नेतृत्व करताना आपल्या भोवतीचे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मोहोळ हटणार नाही याची ते दक्षता घेतात.या गर्दीची गुणवत्ता वाढवण्याचा ते सतत प्रयत्न करतात.आपले कार्यकर्त्यांचे मोहोळ जपण्यासाठी व विकासकामे गतीमान करण्यासाठी जयंत पाटील यांची स्वतंत्र संपर्क यंत्रणा आहे.जयंत पाटील इस्लामपूर शहरात असले की त्यांचा मुक्काम राजारामबापू कारखाना परिसरात असतो.चार खोल्यांचा बंगला,हिरवळ याला लागून त्यांचे संपर्क कार्यालय आहे.बंगल्याच्या आवारात एक झोपाळा व काही खुर्च्या आहेत.याच बंगल्याच्या आवारात राजकीय चर्चा रंगतात.बंगल्या लगत असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून लोकांची गर्दी जमायला सुरवात होते.सकाळी थोडा अल्पोपहार आणि ब्लॅक टी चा आस्वाद घेतल्यानंतर त्यांचा जनसंवाद सुरू होतो. प्रसन्न चेहऱ्याने सर्वांकडे हसरा कटाक्ष टाकत संपर्क कार्यालयात प्रवेश करतात.लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात पत्रावर शेरे मारतात.आवश्यक तेथे फोनाफोनी घडते.महत्वाचे बोलायचे त्यांना जयंत पाटलांच्या गाडीत बसायला जागा मिळते.प्रचंड आश्वासकता हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा स्थायीभाव आहे.संपर्क दौऱ्यात पहिल्या भेटीचे गाव आले की बऱ्याचवेळा गाडीतील माणसे बदलतात.नवा संवाद सुरू होतो.
जयंत पाटील गटात ब्लॅक टी,कार्यक्रम करणे हे शब्द रूढ आहेत.वाळवा तालुक्यातील सभा बैठकातून जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा अनेकवेळा व्यक्त करण्यात येते.मात्र,‘थंडा करके खावो’ या उक्तीनुसार जयंत पाटील या विषयावर थेट बोलणे टाळतात.कुणी मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला तर ते केवळ स्मितहास्य करतात.1995 पासून आपल्या राज्यात कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे आघाडीच्या राजकारणाच्या मर्यादांची त्यांना जाणीव आहे.आपण पात्र पण प्रतीक्षेत आहोत ही बाब ते केवळ स्मितहास्याने दाखवतात.जयंत पाटील यांच्याकडे सार्वजनिक जीवनासाठी लागणारी प्रचंड उर्जा आहे.अर्थमंत्री असताना मोठा अपघात झाला असताना देखील त्यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला होता.निवडणूकांचे व्यवस्थापन कौशल्य ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची जमेची बाजू आहे.रात्री उशीरापर्यंत कारखाना कार्यस्थळावरील व्ही.आय.पी गेस्टहाऊसवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून देखील दुसऱ्या दिवशी त्यांचा उत्साह कायम असतो.बऱ्याचवेळा प्रवासातच डुलकी काढण्यात ते वाक्बगार आहेत.प्रश्नांची चर्चा करताना सर्व तपशील उपलब्ध करून घेण्याकडे त्यांचा भर असतो.चर्चा सुरू असताना स्वतः नोट्स घेणे ही त्यांची कार्यपध्दती आहे.कार्यकर्त्यांचा गराडा आणि भेटणाऱ्या नागरिकांची सततची गर्दी जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनली आहे.
सर्वांशी अनौपचारिक स्नेहभाव व सतत फुलणारे स्मितहास्य यांची प्रसन्न पखरण सुरू असते.त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला आपले काम होईल असा विश्वास वाटतो.निवडणूक प्रचार काळात ते मोटरसायकल,जीप, ट्रॅक्टर अशा मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात.विरोधकांकडून दीर्घकाळ टीका झाल्यावर नर्मविनोदी शैलीत प्रतीपक्षाची खिल्ली उडवतात. विरोधकांचा, ‘आमचे मित्र’ असा उल्लेख करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात त्यांचा भ्रमणध्वनी हा एक स्वीयसहायक आहे.सभा सभारंभ सुरू असताना मोबाईलवरील संदेशवाचन सतत सुरू असते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील अविचल निष्ठा आणि कर्तबगारी यांच्या जोरावर जयंत पाटील सांगली जिल्हयासाठी महत्वाची सार्वजनिक उपलब्धी बनले आहेत भगतदादा आणि जयंत पाटील यांच्यापैकी जयंत पाटील राजकारणात आले.आता नव्या पिढीत प्रतीक आणि राजवर्धन या दोन मुलांपैकी प्रतीक पाटील यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर

प्रा.डॉ.संजय थोरात






































































