Last Updated on 19 Feb 2022 9:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक उडाली.या कारवाईमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.मात्र,या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही शहीद झाले.या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण (वय 23) यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.
जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला.यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.दोघेही राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते.सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून चेरमार्ग गावात कसून तपासणी करण्यात येत होती.त्याचवेळी आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.त्याला सुरक्षा दलाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी जवानांवर गोळीबार सुरू केला. यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.
पाच वर्षांपूर्वी रोमित हे मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते.चार महार येथून त्यांच्या सेवेला सुरुवात झाली होती.एक वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर येथे १ राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाले होते.रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजाराम बापू पाटीलसह साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर बहीण शिक्षण घेत आहे.शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.गावावर शोककळा पसरली आहे.
शहीद रोमित चव्हाण यांना पालकमंत्री जयंत पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली।।
वाळवा तालुक्यातील शिगाव येथील २४ वर्षीय जवान रोमित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथील सोपरमध्ये आतंकवाद्यां शी झालेल्या चकमकीत त्यांच्याशी दोन हात करताना वीरमरण आले. रोमित चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.।।
ना.जयंतराव पाटील
जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी






































































