Last Updated on 16 Mar 2022 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या इलेक्ट्रिक गाडीचे नितीन गडकरी यांनी केले लोकार्पण
देशात हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा उद्देश असलेला भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प
नवी दिल्ली |
जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या गाडीचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत लोकार्पण केले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, आर के सिंह, महेंद्र नाथ पांडे, टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशिमुरा, टिकेएम लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लिमिटेड इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) सोबत जगातील सर्वात प्रगत फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीचा, भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीशी सुसंगत अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प करत आहे.
देशात हरित हायड्रोजन आणि एफसीईव्ही तंत्रज्ञानाच्या अद्वितीय उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करून, हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा उद्देश असलेला भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे.

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देणारा आणि त्याद्वारे भारताला 2047 पर्यंत ‘ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी’ बनवणारा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (एफसीईव्ही), हायड्रोजनवर चालणाऱ्या सर्वोत्तम शून्य उत्सर्जन उपायांपैकी एक आहे. हे पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. गाडीच्या टेलपाईपमधून( इंधनाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जन बाहेर सोडणारा पाईप) पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन यात होत नाही.
अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून हरित हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो. हरित हायड्रोजनच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि अवलंब, भारतासाठी भविष्यात स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
एक पथदर्शी प्रकल्प
वेगवान आर्थिक विकास साधण्यासाठी स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी असणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. हायड्रोजन हा उर्जा धोरणाचा मुख्य घटक आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी राखणाऱ्या उर्जा मार्गांमध्ये महत्वाची भूमिका बजावेल. हरीत हायड्रोजन रस्ते वाहतुकीसह अनेक क्षेत्रांना डीकार्बोनाइज करण्याच्या मोठ्या संधी देते आणि जागतिक स्तरावर याचा वेग अभूतपूर्व आहे. हरीत हायड्रोजनद्वारे समर्थित वाहतूक हा भविष्यातील महत्त्वाचा तंत्रज्ञान पर्याय ठरणार आहे, विशेषत: मध्यम ते लांब पल्ल्यांसाठी सर्वात अनुकुल असलेल्या मोठ्या कार्स, बस, ट्रक, जहाजे आणि ट्रेनमध्ये हा योग्य पर्याय आहे.
स्वयंपूर्णता मिळवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेवर आधारित आणि जीवाश्म इंधनापासून ते पर्यावरणाच्या संवर्धनाकडे उर्जा संक्रमणासाठी अनेक मार्गांचा अवलंब करून शाश्वततेला प्रोत्साहन देण्याच्या टोयोटाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लिमिटेड इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) सोबत जगातील सर्वात प्रगत फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाचा, भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीशी सुसंगत अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प करत आहे.
हायड्रोजन, एफसीईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता पसरवणे आणि भारतासाठी हायड्रोजन-आधारित समाजाला समर्थन देण्यासाठी त्याचे फायदे प्रसारित करणे हा उद्देश असलेला देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असेल.












































































