Last Updated on 30 May 2023 11:05 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
इस्लामपूर येथे मुक्तांगणचे अनोखे शिबीर
नवकल्पना : निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक खेळ आणि बैलगाडीतून शिवार फेरी…
![]()
सांगली । इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या ‘चला मामाच्या गावाला’ या अनोख्या शिबीरात सहभागी होत भाचे कंपनीने मौज-मजा मस्ती केली. दगडाने आंबे पाडून खाणे,पापड लाटणे,सांडगे-कुरडया घालने,पाटावरच्या शेवया वळणे आदी उन्हाळी कामे केली गेली.निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक खेळ खेळतांना शिबीरार्थीनी बैलगाडीतून शिवार फेरीही काढली.
उन्हाळी सुट्टीत वेगवेगळी शिबिरे असतात पण चला मामाच्या गावाला या अनोख्या शिबिरातून मुलांना मामाच्या गावचे अनुभव दिले गेले. `पारंपरिक खेळ,शेतातील विविध अनुभव, संगीत, चित्रकला, चित्रपट, पोलीस संवाद तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे धडे देण्यात आले. मनोरंजना सोबत ज्ञानवर्धनाचा आनंद लुटला. गिटार वादन, रेषापासून सहज चित्रं कशी रेखाटली जातात हे शिकवण्यात आले.तसेच तीव्र उन्हाळ्यात भाच्चे कंपनीने रेन डान्सचा मनसोक्त आनंद घेतला.सोबत बर्फाच्या गोळ्याची चवही अनुभवली.

आपल्या आगळावेगळा उपक्रमांनी प्रसिद्ध असलेल्या मुक्तांगण तर्फे घेण्यात आलेल्या शिबिराचा पहिला दिवस मुक्तांगण स्कूलच्या कॅम्पस मध्येच होता.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाहुणचार हे सत्र राबवले गेले.यात पाहुण्यांचे स्वागत करताना रांगोळी रेखाटने,सरबताचे विविध प्रकार,फेटा नेसवणे या गोष्टी शिकवण्यात आल्या.लयबद्धता आणि कृतीयुक्त अशा मामाच्या गावाला जाऊ या गीताने धमाल केली.गायिका वंदना कांबळे यांनी गीत गायनाचे धडे दिले.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी मुलांशी संवाद साधत पोलिसांकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेतल्या.कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते याबाबत संवाद साधला.

इटकरे येथे आंब्याच्या आमराईतील गर्द सावली टेन्ट चा अनुभव घेतला. तर तुकाई टेकडी येथे वडाच्या झाडाखाली पारंब्या खेळण्यात मुलं दंग झाली होती. चित्ररेखाटण्याची कला जयंत शिंदे यांनी दिली. संजय बोडरे यांनी गिटार वादनातून निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळा अनुभव दिला. सायंकाळी स्वतः कांदा कापत शिबिरार्थी मुलांनी चिरमुरे फरसाणा शेव टाकून भेळ बनवत खाण्याचा आस्वाद घेतला.

शिबिरार्थी मुलांनी येलूर येथे शेत वस्तीला भेट देत फणस,चिकू, पेरू,आंब्याची झाडे, पपईची बाग पाहिली. दगडाने आंबे पाडणे, बैलगाडीत बसून फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.
तीन दिवसात मुलांनी भोवरा,लगोरी, गलोरी सूरपारंब्या, विटी-दांडू, रस्सीखेच, टायर फिरवणे, गोट्या खेळण्याचा आनंद घेतला.

मुक्तांगणच्या संचालक सरोजनी,वर्षाराणी व विनोद मोहिते,तेजस्विनी ताटे,दिपाली पवार,धनश्री पाटील यांनी संयोजन केले.कृष्णा नाथगोसावी,मयुरी पाटील,अमोल चौधरी,चित्रकार जयंत शिंदे,गायिका वंदना कांबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव,संजय बोडरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.जादूगार शालिमार यांनी आपली जादूची कला दाखवत मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.
![]()
समारोप प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले,’मोबाईलच्या जमान्यात लोप पावत चाललेल्या रुढीपरंपरा नव्या पिढीला देण्यासाठी आणि हरवत चाललेल्या मामाच्या गावच्या आठवणी जाग्या करण्यासाठी हा उपक्रम मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल.’
![]()
पालक प्रतिनिधी सागर मुळीक म्हणाले,’अमेरिका स्थित माझ्या भाच्यांनी आणि कुटुंबातील चार मुलांनी शिबिराचा मनसोक्त आनंद आणि वेगवेगळे अनुभव घेतले. मुलांना नवीन काही देता आले याचा एक आनंद आहे.’
![]()
ग्रामीण भागातील चित्रण असणारा वाळवा आणि शिराळा तालुक्यातील मुलांनी अभिनय केलेला ‘तेंडल्या’ चित्रपट मुलांनी पाहिला.
![]()


![]()










































































