Last Updated on 09 Nov 2022 7:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
थोडक्यात पण महत्वाचे
- राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
- संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू
- नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022
मुंबई । राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
राज्यात ग्रामपंचायतींचा दिवाळीनंतर प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.त्यानुसार अखेर आज या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.आधी ग्रामपंचायत की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक हा संभ्रम होता.पण,ग्रामपंचायत निवडणूका आधी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे.
राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींची मुदत लवकरच संपणार आहे.तोपर्यंत आज राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 21 ऑक्टोबरला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
या जिल्ह्यात होणार निवडणुका
अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक जिल्ह्यात 7,751 ग्रामपंचायतींच्या आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751
असा असेल निवडणूक कार्यक्रम
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार),
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3.
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर.
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यांकरीता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत).
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाघिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार).
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत.
ग्रामीण राजकारण अडकले घर-वाडा,भावकीत
काही गावांमध्ये प्रस्थापितांविरोधात युवावर्ग नाराज असल्याचेही चित्र आहे.त्यामुळे काही ठिकाणी नव्या आघाड्या होण्याचे संकेत मिळत आहेत.काही गावांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजीचा सूर आहे.भ्रष्टाचाराची काही प्रकरणे चर्चेत आहेत.काही ठिकाणी गेली अनेक वर्षे तेच ते गट एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत.त्यामुळे ठराविक लोकांना पुन्हा-पुन्हा संधी मिळत आहे.गावाच्या विकासाला प्राधान्य मिळण्याऐवजी घर-वाडा आणि भावकीच्या राजकारणामुळे अनेक ठिकाणी गावाच्या विकासाला खो बसत असल्याचे चित्र आहे.घर-वाडा,भावकी अशी रणनीती आखून राजकारण होत असल्यामुळे अनेक कर्तृत्ववान लोकांना अशा प्रक्रियेपासून दूर रहावे लागत आहे.
राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 23 महापालिका, 220 नगरपरिषदा व नगरपालिका आणि 284 पंचायत समित्यांची मुदत संपून आता सात महिने पूर्ण झाले आहेत.पण, प्रभागरचनेचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही.
निवडणुका होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या


















































































