Last Updated on 29 Aug 2024 7:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश
नवी दिल्ली । बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळावरून लवकरच हवाई वाहतूक सुरू होणार असून विमानतळासाठी आवश्यक असलेला डीजीसीए परवाना आणि तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कामे विमानतळावर युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरकरांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सोलापूर विमानतळाबाबतच्या विविध विषयांसंदर्भात नवी दिल्लीत मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली,
त्यात हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शरद कुमार यांच्यासह अक्सा आणि इंडिगो कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.













































































