Last Updated on 02 Jul 2023 8:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ई -पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर वर उपलब्ध
आतापर्यंत सुमारे 1.88 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केले रजिस्ट्रेशन
सिंधुदुर्ग । खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई -पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन गुगल व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023पासून सुरु करण्यात येत आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे 1.88 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे.आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी पूर्ण करावी,जेणेकरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.
अशी करा पिकांची नोंद
ई-पीक पाहणी ॲपवर वापरून पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करायचं आहे.
त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करायचं आहे. इथं ई-पीक पाहणीचं व्हर्जन-2 वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे.
इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. याला डावीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.
पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.
त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे आणि मग नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथं सुरुवातीला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून पुढे जायचं आहे.
मग पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.
मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा नावाचं पेज ओपन होईल.
आता तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.
इथल्या हो या पर्यायावर क्लिक करा. मग खातेदाराचं नाव निवडा. सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा आणि मग सांकेतांक क्रमांक टाका.
आता पीक पाहणीच्या ॲपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.
पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.
एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.
फोटो काढून झाला की बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली, ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. त्याखालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला क्लिक करून पुढे जायचं आहे.
पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे म्हणायचं आहे.
त्यानंतर पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.
अशाचप्रकारे या ॲपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.







































































