Last Updated on 31 Jul 2023 9:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे आव्हाने येत असून त्याचा मुकाबला करण्याची क्षमता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे.विद्यार्थ्यांच्या कौशल्य,क्षमता व मूल्ये विकासासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पोषक असून या शैक्षणिक धोरणातून देशासाठी विकसित मनुष्यबळ तयार होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयांमध्ये ते ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ सप्ताह निमित्त आयोजित एकदिवशीय विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,नवे शैक्षणिक धोरण मूल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीचे ज्ञान विकसित करणारे आहे.या धोरणाद्वारे आपला देश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर ठरेल.तसेच नियमित अभ्यास क्रमाबरोबरच कौशल्य आधारित विविध कोर्सेस व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत असलेले विविध उपक्रमामधील विद्यार्थ्यांचा सहभाग इथून पुढे महत्त्वाचा ठरणार आहे.एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे धोरण आवश्यक असणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्रो.डॉ. शीला रत्नाकर म्हणाल्या,भारताला जागतिक ज्ञान महासत्ता” बनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे अंतिम उद्दीष्ट आहे. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात प्रो. डॉ. स्नेहल हेगिष्टे म्हणाल्या,नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात गुणवत्तेला पर्याय नाही.या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ,महाविद्यालय व शालेय स्तरामध्ये अमूल्याग्रह बदल केले असून गुणांच्या ऐवजी क्रेडिट सिस्टीमचा अवलंब करण्यात आला आहे.गुणवत्ता वाढीसाठी नॅक व आयक्यूएसी सक्षमपणे कार्यरत आहे.
तृतीय सत्रात डॉ. राम घुले मार्गदर्शन करताना म्हणाले,नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित असून प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण म्हणजे क्रेडिट त्यांच्या ‘एबीसी’ आयडी या शैक्षणिक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या धोरणानुसार विद्यार्थ्यांचा काही कारणाने शिक्षणात खंड पडल्यास शैक्षणिक नुकसान होत नाही.
या कार्यशाळेस महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रा. डॉ. अशोक मरळे यांनी कार्यशाळेचे आभार मानले.प्रा.संजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.






































































