Last Updated on 22 Oct 2023 10:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सुबक रांगोळ्यांच्या पायघड्यांनी सजला देवीचा नगर प्रदक्षिणा मार्ग
कोल्हापूर । शाही दसरा महोत्सव अंतर्गत पर्यटन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने ताराबाई रोड येथे आयोजित गालिचा रांगोळी स्पर्धेमध्ये कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये महिलांसह पुरुषांनी साकारलेल्या सुबक रांगोळ्यांनी भाविकांचे व समस्त नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच श्रीअंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणा मार्गावर दरवर्षीप्रमाणे काढण्यात आलेल्या सुबक रांगोळ्यांच्या पायघड्यांनी हा मार्ग सजला.

पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी गालिचा रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे संदेश देखील दिले.
रांगोळी रेखाटन, मांडणी,आकारमान,रंगसंगती, एकूणच रांगोळीचे सादरीकरण या निकषावर गुण विभागणी करण्यात आली. संस्कार भारती रांगोळी तज्ज्ञ वरदा बिदनुर, कोल्हापूर व सर्जेराव कांबळे, नृसिंहवाडी, अनंत देशपांडे, सोलापूर यांनी रांगोळ्यांचे परीक्षण केले.

दरम्यान,माहिती अधिकारी वृषाली पाटील,दसरा महोत्सव संयोजन समितीचे सदस्य उदय गायकवाड व आदित्य बेडेकर यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपायुक्त साधना पाटील, उप शहर अभियंता नारायण भोसले यांनी या रांगोळी स्पर्धेसाठीची जबाबदारी पार पाडली. अनंत यादव, कविता बंकापुरे, नागेश हंकारे, मिलिंद शिंदे तसेच या दसरा महोत्सव संयोजन समितीच्या सदस्यांनी रांगोळी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले.

फन स्ट्रीटवर कोल्हापूरकरांची धमाल
दसरा चौक ते जयंती पुल या मार्गावर पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आयोजित फन स्ट्रीटवर आज विविध खेळ आणि कलाप्रकारांमध्ये सहभागी होत कोल्हापूरकरांनी धमाल केली. जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, विटी दांडू, मातीची भांडी तयार करणे (टेराकोटा), गोट्या, स्केटिंग, झुंबा, रस्सीखेच, दोरी उड्या, आदी खेळांमध्ये सहभागी होत लहान मुलांसह अबालवृद्धांनी मनसोक्त आनंद लुटला. सहायक आयुक्त संजय सरनाईक, हॉटेल चालक मालक संघाचे उज्वल नागेशकर व सचीन शानबाग यांच्या हस्ते फन स्ट्रीट वरील विविध खेळ प्रकाराची सुरुवात झाली.
वेदिका भोसले, वरद बक्षी, दीक्षा सुतार यांनी सादर केलेली सुंदर गीते तसेच शिवम मगदूम, हर्षाली बेलवलकर यांच्या दमदार नृत्याविष्कारांवर रसिकांची पावले थिरकली. ओंकार रोकडे यांनी झुंबा डान्सच्या माध्यमातून चैतन्य निर्माण केले.
एस. के. रोलर्स स्केटिंग अकादमीचे स्केटिंग प्लेअर्स, अष्टविनायक भजनी मंडळाची हादगा, भोंडला गीते व नृत्य, बसवेश्वर लेझीम पथक व ऊर्जा लेझीम पथकासोबत कोल्हापूरकरांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. गौरव काइंगडे, शुभम कुंभार व अमन शेख यांनी तयार केलेली मातीची भांडी व खेळण्यांची (टेराकोटा) प्रात्यक्षिके पाहून लहानांसह मोठ्यांनीही मातीच्या वस्तू बनवण्याचा आनंद घेतला. अक्षय जाधव यांनी मुलांच्या हातावर काढलेल्या आकर्षक टॅटू नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निशांत गोंधळी यांच्या निवेदनाने नागरिकांना खिळवून ठेवले.
कोल्हापूरातील अबाल वृद्धांनी फन स्ट्रीट वरील विविध खेळ प्रकाराची मजा लुटली. यावेळी दृष्टीबाधित दिव्यांग बांधवानी उपस्थितांना कोल्हापूर पर्यटनाची माहिती दिली.












































































