Last Updated on 17 May 2023 11:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भारतातील मान्सूनची नांदी केरळातील मान्सूनने होते, यावर्षी केरळात मान्सून थोड्या विलंबाने म्हणजे ४ जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.गेल्यावर्षी २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता.केरळमध्ये मान्सूनचं आगमन उशिरा झाले तरी पुढचा प्रवास उशिरा होईलच हे आताच सांगता येणार नसल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.
दरवेळी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा हाच मान्सून दोन ते तीन दिवस उशिराने दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.
गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.कोकणात काही ठिकाणी तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल असे हवामान विभागाने म्हटले आहे.राज्यात सर्वाधिक तापमान काल नागपूर येथे ४३.२ अंश सेल्सियस नोंदवलं गेले.विदर्भाच्या काही भागात जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
ढगांचे क्षेत्र प्रतिकूल
मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) उष्णकटिबंधीय प्रदेशात पूर्वेच्या दिशेने सरकणारे ढगांचे क्षेत्र सध्या भारतासाठी प्रतिकूल स्थितीत असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात हे क्षेत्र पुन्हा भारतासाठी अनुकूल स्थितीत येण्याची शक्यता ‘हवामानशास्त्रीय मॉडेल’ वर्तवत आहेत. दक्षिण गोलार्धातून विषुववृत्त ओलांडून भारतीय उपखंडावर येणारा मोसमी वाऱ्यांचा प्रवाह (क्रॉस इक्विटोरियल फ्लो) मे अखेरीस अरबी समुद्रावर सक्रिय होतानाच ‘एमजेओ’ हे ढगांचे क्षेत्रही त्याच काळात हिंदी महासागरावर येण्याची शक्यता असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून अरबी समुद्रासह केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) विस्तारित अंदाजामधून वर्तवण्यात आली आहे.
‘आयएमडी’तर्फे २००५ पासून मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या तारखेचा अंदाज देण्यात येतो. त्यासाठी सहा घटकांचा समावेश असलेल्या सांख्यिकी मॉडेलचा आधार घेतला जातो. २०१५ हे वर्ष सोडता इतर सर्व वर्षांमध्ये आयएमडीचा केरळमधील मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज हा त्रुटीच्या मर्यादेत राहिला असल्याचे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे.











































































