Last Updated on 23 Dec 2025 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल
सातारा । सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याला ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पुणे येथे आयोजित शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सातारा जिल्ह्यात ऊसास दिलेला उच्चांकी दर, प्रशासनातील पारदर्शकता, कारखान्याचे आर्थिक नियोजन, खर्चात बचत, योग्यवेळी साखर निर्यात, जयवंत आदर्श योजनेचे यश, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर, फिल्ड स्टाफ आपल्या दारी, गाळपातील तत्परता, इथेनॉल व आसवनी प्रकल्प, को-जन पूर्ण क्षमतेने सुरू, बायो कंपोस्ट व पर्यावरण बाबींची पूर्तता याचा अभ्यास करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार मंथन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्णा कारखान्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, विलास भंडारे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, वैभव जाखले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत आहे. हा पुरस्कार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) व स्व. जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांच्या स्मृतींना समर्पित करत आहोत.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक डॉ. विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे चेअरमन गौतम कोतवाल तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.











































































