Last Updated on 29 Aug 2023 10:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते,कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजे 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.तसेच,क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ करणार असल्याचे ही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्रीकांत शरदचंद्र वाड यांना सन 2019-20 या वर्षाचा तर दिलीप बळवंत वेंगसरकर यांना सन 2020-21 या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.तिसरे जीवन गौरव पुरस्कार विजेते आदिल सुमारीवाला परदेशात असल्यामुळे पुरस्कार स्विकारू शकले नाहीत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,खासदार श्रीरंग बारणे,क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल,क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,’जसा ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्रातल्या मातीतला सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव,ज्यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले.त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करतो’.
पुरस्कारांच्या रक्कमेत वाढ; आजच्या पुरस्कारार्थ्यांनाही लाभ
क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा नितांत आदर राज्य सरकारला आहे. त्यांच्या कार्यातून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे सांगून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. आज दिलेल्या पुरस्कार विजेत्यांनाही वाढीव पुरस्कार रक्कम देण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले.











































































