Last Updated on 11 Nov 2024 4:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता कुठं रंग भरू लागला आहे. आरोप -प्रत्यारोपाबरोबरच ग्रामीण भागात कोणाला किती मतं मिळतील याची अंदाज बांधणी आतापासून सुरु झाली आहे. या राजकीय प्रचाराच्या रंगात काही किस्सेही घडताना दिसत आहेत. पण, निवडणुकीच्या प्रचाराचा फड सुरु झाला की गेल्या वीस वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आजही चर्चेत येतोच.
त्याचं असं झालं होतं,
वीस वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला होता. ‘साहेब’ या निवडणुकीला उभे होते. प्रचारासाठी गावोगावी साहेबांचे दौरे सुरु होते. त्यांचे कार्यकर्ते उत्साहाने प्रचाराला लागले होते. गावोगावच्या प्रचार सभा – बैठकांमध्ये साहेबांना कार्यकर्ते हे आपल्याला किती मतं आणि कशी पडणार याची एकप्रकारे कुंडलीच मांडत होते. साहेबांसमोर बोलायचं आहे त्यामुळं थोडं रेटूनच बोललं पाहिजे. तसतसं आकडे बाहेर पडू लागले.
कोणी ५५ टक्के, कोणी ६० टक्के, कोणी ७० टक्के, कोणी ८० टक्के असे सांगता-सांगता काही कार्यकर्त्यांचा आकडा थेट ९० टक्क्याच्या वर जावून पोहोचायचा. काहीजण तर विरोधकांकडे नुसती चार टाळकीच आहेत, त्यामुळं त्यांना अवघी पाच -दहा मतं सुद्धा पडणार नाहीत असं साहेबांना ठासून सांगायचे.
साहेब एक दिवस कृष्णा नदीकाठच्या एका गावात प्रचार बैठकीसाठी गेले होते. त्या गावातही काही कार्यकर्ते आपल्या-आपल्या विचाराच्या पोथडीतून असेच काहीसे आकडे काढत होते. त्याचवेळी त्या गावातील एक वजनदार पुढारी उठले. आणि म्हणाले, ‘साहेब, काय काळजी करू नका. गावातील सगळं गट आपल्याबरोबर आहेत. त्यामुळं आपल्याला ‘पोत्यानं मतं’ पडणार आहेत’. असं म्हणताच या वजनदार पुढाऱ्यांना मानणारा कार्यकर्ता ताडकन उठला आणि म्हणाला, ‘अहो, पोत्यानं काय बोलताय, हितं पोतं खालणं फाटलंय. साहेब, त्याला ठिगळं लावूनही आमचा काय उपयोग होणार नाय. साहेब आता तुम्हीच शिवल्याशिवाय फाटलेलं पोतं सांधणार नाय’. असं तो कार्यकर्ता म्हणताच तेथे उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला.
हा किस्सा घडून आज वीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. निवडणूक काळात घडलेल्या घटना, किस्से वर्षानुवर्षे चर्चेत राहतात तसे प्रत्येक निवडणुकीत (मग ती कोणतीही असो) हा किस्सा पुहा-पुन्हा चर्चेत येतो.












































































