Last Updated on 23 Jul 2022 8:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुक्तांगणच्या चिमुकल्यांची वनसंवर्धनदिनी अनोखी सहल
रोपवाटिकेत रोप निर्मिती घेतली समजावून…
सांगली ।
काय डोंगर…काय झाडी….निसर्ग आमचा लयं भारी म्हणत..इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्यांची वनसंवर्धनदिनी सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत अनोखी सहल काढली.रोप निर्मितीची प्रक्रिया, झाडांचे विविध प्रकार पाहिले.डोंगर,झाडी पाहून मुले हरवून गेली.
इस्लामपूरच्या दक्षिणेला असलेल्या दत्त टेकडी परिसरातील सामाजिक वनीकरण विभागा व मुक्तांगण प्ले स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षसंवर्धन दिनाचा अनोखा कार्यक्रम साजरा झाला.पृथ्वीवरील जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक साधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम झाला.याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोट्या-छोट्या वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उत्सर्जन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते याबाबत मुलासह पालकांची जनजागृती करण्यात आली.
चिमुकल्या मुलांनी झाडे लावा , झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा वनचरे, पृथ्वी,प्राणी वाचवा असे संदेश देणारे फलक आणि विविध प्रतिकृती होत्या. काहींनी संदेश देणाऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या.पालकांनीही सहलीचा आनंद लुटला. सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीमध्ये विविध प्रकारच्या झाडांची माहिती घेतली. बीज रोपण करून वृक्ष निर्मिती कशी होते ? या प्रक्रियेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मुक्तांगणचा उपक्रम कौतुकास्पद
सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एफ आर शिकलगार म्हणाले,” वन संवर्धन काळाची गरज ओळखून मुक्तांगण प्ले स्कूल मुलांना संस्कार देण्यासाठी घेतलेल्या उपक्रम कौतुकास्पद आहे.वनपाल जे.एन. खराडे,सुरेश चरापले वनरक्षक सुप्रिया मदने उपस्थित होत्या.
मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी स्वागत केले. धनश्री पाटील यांनी आभार मानले. तेजस्विनी ताटे,मोनाली धोत्रे, वनमजूर एस. एन. जाधव, एकनाथ केसरे अक्षय गावाळे, विशाल चौगुले यांनी उपक्रमाचे संयोजन केले.











































































