Last Updated on 28 Dec 2025 5:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । “मेथी, चाकवत, कोंथिंबीर, पालक दहा रुपयांना पेंडी… काकडी, बीट, गाजर स्वस्तात… गोड बोरं घ्या, सफरचंद–संत्री गोड आहेत…” अशा उत्साही आरोळ्यांनी उरुण–ईश्वरपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलचा परिसर काही काळासाठी जणू भाजी बाजारातच बदलून गेला होता.
निमित्त होते प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मार्केट डे व आनंद मेळावा’ या उपक्रमाचे. या अनोख्या उपक्रमाला पालकवर्गासह प्रकाश शैक्षणिक संकुलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मार्केट डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तिन्ही भूमिका प्रत्यक्ष अनुभवत व्यवहारज्ञान आत्मसात केले.

या मेळाव्याचे उद्घाटन एल.आर.पी. आयुर्वेद हॉस्पिटलमधील पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. दीपक परीडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रशासिका सौ. सुनिता निशिकांत भोसले-पाटील, शाळेचे प्राचार्य डॉ. मधुकुमार ए. नायर, उपप्राचार्या सौ. सिंधू एम. नायर, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्केटमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः उभारलेल्या स्टॉल्समधून विविध भाज्या, फळे, खाद्यपदार्थ, शीतपेये, शालेय उपयोगी साहित्य विक्रीस ठेवण्यात आले होते. याशिवाय भेळ, पाणीपुरी, व्हेज मंच्युरियन, चणे, फुटाणे यांसारख्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही मोठी गर्दी पाहायला मिळाली. फनी गेम्स, हॉरर शो आणि मनोरंजनात्मक खेळांनी मेळाव्याची रंगत आणखी वाढवली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदी-विक्री करताना पैशांचे व्यवहार, नफा-तोटा, नियोजन, संवाद कौशल्य यांचा अनुभव घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेला चालना मिळाली, तर त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळाला. मार्केट डे निमित्त संपूर्ण परिसर आनंदी वातावरणाने भारलेला होता.
या उपक्रमाबद्दल प्रकाश शिक्षण, आरोग्य व उद्योग समूहाचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणासोबत व्यवहारज्ञान देणाऱ्या या अभिनव उपक्रमासाठी प्रकाश पब्लिक स्कूलच्या संयोजकांचे अभिनंदन केले.











































































