Last Updated on 26 Oct 2022 4:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । सगळीकडे दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच दुसऱ्याबाजूला पावसामुळे थांबलेल्या ऊसतोडी सुरु झाल्याच्या आनंदात ऊसावर कोयत्याने सपासप वार करत ऊसतोडणी मजुर तोडणीच्या कामाला लागले आहेत.आमची दिवाळी उसाच्या फडातच…दररोज राबल्याशिवाय चूल पेटत नाही.त्यामुळं आमची कसली दिवाळी असा उलट सवाल ऊसतोडणी मजुरांनी ‘अधोरेखित’शी बोलताना केला.
पश्चिम महाराष्ट्रात काही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत.बीड उस्मानाबाद,नंदुरबार आदी जिल्ह्यातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच हजारो मजूर ऊस तोडीसाठी सांगली,सातारा,कोल्हापूर आदी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.पण,गेल्या आठ-दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे तोडी सुरु झाल्या नव्हत्या. शेतात पाणीच-पाणी झाले होते.हातावरचे पोट असणाऱ्या या मजुरांना शेतात मिळेल ते काम करून आपली गुजराण करावी लागत होती.

पण,शनिवार सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने वाळवा तालुक्यातील बहे-हुबालवाडी परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या फडात काही प्रमाणात ऊस तोडीना सुरवात झाली आहे.त्यामुळे ऊसतोडी सुरु झाल्याचा आनंद ऊस तोडणी मजुरांच्या चेहऱ्यावर दिसत होता.त्या आनंदातच ऊस तोडणी सुरु केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातून आलेले ऊस तोडणी मजूर गेली चार दिवस कृष्णाकाठाला रस्त्यालगतच्या शेतात ऊस तोडी करताना दिसत आहेत.यावेळी प्रसिद्ध कवी सुरेश मोहिते यांच्या ‘कोयता’ या कवितेतील भर दुपार…उसावर कोयत्याने सपासप वार! या ओळी प्रकर्षाने डोळ्यासमोर येतात.
एकाबाजूला सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसत आहे.कृष्णाकाठच्या गावात यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होत आहे.साखर कारखान्यांनी दिवाळीसाठी दिलेली ऊस बिले त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावरच दिलेले 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे.लहान मुलांना नवीन कपडे-फटाके त्याचबरोबर बच्चे कंपनी किल्यांच्या सजावटीत व्यस्त आहेत असे चित्र आहे.तर दुसऱ्या बाजूला दिवाळी विसरून पोटाची आग बुजवण्यासाठी ऊस तोडणी मजुरांची दिवाळी फडातच ऊस तोडणी करून साजरी होत आहे.ऊस तोडणी केल्याशिवाय चूल पेटणार नाही ही जाणीव उराशी बाळगून हे मजूर तोडीच्या कामाला लागले आहेत.एकाबाजूला उत्साह तर दुसऱ्याबाजूला दिवाळी उसाच्या फडातच साजरी होताना दिसत आहे ही विषमता पाहावयास मिळत आहे.

उसाच्या फडात ऊस तोडणी मजुरांची काही मुलं आपल्या वडीलधाऱ्यांना हातभार लावताना दिसत आहेत.तर काही लहान मुलं फडातच बागडताना दिसत आहेत.आमची दिवाळी उसाच्या फडातच…दररोज राबल्याशिवाय चूल पेटत नाही.त्यामुळं आमची कसली दिवाळी असा उलट सवाल ऊसतोडणी मजुरांनी ‘अधोरेखित’शी बोलताना केला.
![]()
अशावेळी कवी सुरेश मोहिते यांच्या कवितेतील मनाला भिडणाऱ्या या ओळी डोळ्यासमोर येतात…

बऱ्याचदा ही लेकरं सरीतचं जन्म घेतात
आणि सहकाराच्या नावानं
पहिलंवहिलं भोकाड पसरतात…
सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी
या लेकरांचं भोकाड पसरणं
पण सहकार धुर्तपणानं
आपली बधिर बोटं कानात घालतं
मनातल्या मनात आनंदित होतं
एक नवा ‘कोयता’ जन्माला आला म्हणून…
![]()












































































