Last Updated on 28 Nov 2024 9:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश होणार
नवी दिल्ली । आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल.
देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे. उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल, असंही यात सांगण्यात आलं आहे.
सध्या कर्मचारी राज्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत सूचिबद्ध १६५ रुग्णालये, १५९० दवाखाने, १०५ दवाखाने वजा शाखा कार्यालये (Dispensary cum Branch Offices) आणि सुमारे २९०० खाजगी रुग्णालयांच्या विद्यमान आरोग्य पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आरोग्य विषयक सेवा पुरवल्या जात आहेत. यापुढेही कर्मचारी राज्य विमा योजने योजनेंतर्गतच्या या वैद्यकीय सेवा लाभार्थ्यांसाठी सुरूच राहणार आहेत.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोबत कर्मचारी राज्य विमा योजनेचे विलिनीकरण झाल्यावर त्याचा देशभरातील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना लाभ होईल. इतकेच नाही, तर या लाभार्थ्यांसाठी दर्जेदार आणि सुलभतेने उपलब्ध असतील अशा प्रकारच्या वैद्यकीय सेवा प्रदान करण्याच्या दिशेने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांनाही हे विलिनीकरण अधिक पूरक ठरणार असून, त्यामुळे या प्रयत्नांना अधिक बळही मिळणार आहे.











































































