Last Updated on 04 Mar 2022 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुढील 24 तासात 11 नागरी आणि हवाई दलाच्या 4 विमानांनी आणखी नागरिकांना परत आणणार
नवी दिल्ली ।
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या ‘ ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून 14 नागरी विमाने आणि 3 सी-17 विमाने अशी एकूण 17 विशेष विमाने देशात परतली आहेत. आजच्या दिवसात उशिरा आणखी एक नागरी विमान परत येण्याची अपेक्षा आहे.
नागरी विमानांमधून 3142 व्यक्तींना आणण्यात आले तर सी-17 विमानांनी 630 प्रवाशांना परत आणले आहे. आतापर्यंत 43 विशेष नागरी विमानांमधून 9364 पेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले आहेत तर 7 सी-17 विमानांनी आतापर्यंत 1428 प्रवाशांना परत आणले आहे
तसेच या विमानांनी 9.7 टन मदत सामग्री देखील वाहून नेली. आजच्या नागरी विमानांमध्ये बुखारेस्टच्या चार आणि सुचावा येथील 2, स्लोवाकियातील कोशिचेहून 2, हंगेरीतील बुडापेस्टहून 4 पोलंडमधील झेजोवच्या 3 विमानांचा तर भारतीय हवाई दलाच्या विमानांमध्ये बुखारेस्टहून आलेल्या दोन आणि बुडापेस्टहून आलेल्या एका विमानाचा समावेश होता.
उद्या 11 विशेष नागरी विमानांनी 2200 हून जास्त भारतीय परतण्याची अपेक्षा आहे. यापैकी 10 दिल्लीत तर एक मुंबईत उतरेल. यापैकी 5 विमाने बुडापेस्टहून, दोन झेजोहून आणि 4 सुचावाहून निघतील. चार सी-17 विमाने रुमानिया, पोलंड आणि स्लोवाकियासाठी प्रवासात आहेत आणि ती रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे पोहोचण्याची अपेक्षा आहे.












































































