Last Updated on 25 Dec 2024 5:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | (सुधारित वृत्त) कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.
२८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.
२९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल आणि ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुसळधार पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्याची हवामान विभागाची अचूकता गेल्या ५ वर्षांत, ६० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत
मुसळधार पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्याची हवामान विभागाची अचूकता गेल्या ५ वर्षांत, ६० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या १५० व्या स्थापना दिना निमित्त, विभागाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांनी माहिती दिली. हवामान बदल ही सततची समस्या आहे. हवामान बदला संदर्भातल्या समस्यांना तोंड देण्यासाठी भारतानं, आतापर्यंत अनेक पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं. जगातले केवळ ५ देशच विजांचा अंदाज वर्तवू शकतात. भारतानं वीजांवर अभ्यास करण्यासाठी बालासोर इथं इस्त्रो आणि डीआरडीओ च्या मतदीनं एक चाचणी केंद्राचीही उभारणी केली आहे. तसंच झारखंड, ओदिशा आणि पश्चिमबंगालमध्ये अधिकच्या निरिक्षण यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठ... Read more












































































