Last Updated on 18 May 2023 11:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अहमदनगर । राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी (17 मे 2023) रात्री अहमदनगर येथील माळीवाडा येथील आपल्या राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले.ते 99 वर्षांचे होते.त्यांच्या निधनामुळे एसटी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.यंदाच्या एक जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948 रोजी झाली.राज्यात 1 जून 1948 साली पुणे-नगर मार्गावर पहिली एसटी बस धावली.त्यावेळी पहिल्या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक म्हणून लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते.पहिली बस चालू करण्याचा मान अहमदनगर विभागाला मिळाला होता. त्या बसवर पहिल्या वाहकाचा मान शहरातील लक्ष्मणराव केवटे यांना मिळाला होता.
लक्ष्मण केवटे हे नगर ते पुणे या बसचे पहिले वाहक होते.लक्ष्मण केवटे ज्यावेळी महामंडळात भरती झाले तेव्हा त्यांना 80 रुपये पगार मिळत होता.पुढे त्यांना 150 रुपयांपर्यंत पगार मिळू लागला होता.नगर ते पुणे या अंतरासाठी पहिल्या बसचे भाडे हे अडीच रुपये होते.साधारणपणे नगर ते पुणे हे अंतर सव्वाशे किलोमीटर होते.बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे होते.नागरिकांनी बसचे पूजन देखील केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आदरांजली
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे.1948 साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे.त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे.या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.









































































