Last Updated on 09 Feb 2022 6:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुरात झाला एचआयव्हीबाधितांचा वधुवर मेळावा
मेळाव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ८७ जणांनी हजेरी लावली
या मेळाव्यात ५१ पुरुष व ३६ महिलांनी सहभाग नोंदवला
वधुवर परिचयातून ६ जोडप्यांनी आपला जोडीदार निवडला
सांगली । विनोद मोहिते
जोडीदाराची गरज प्रत्येकाला असते. शारीरिक गरजांसाठी तसेच मानसिक पाठबळासाठीही. एचआयव्हीसोबत जगणाऱ्या, जोडीदाराला गमावलेल्या, एकाकी पडलेल्या व्यक्तींना औषधांसोबतच मानसिक आधाराचीही गरज भासते. मात्र समाजापासून दुखणे दूर ठेवत असलेल्या एचआयव्हीबाधितांना जोडीदार शोधताना अनंत अडचणी येतात. त्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष सांगली व उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूरच्या एआरटी सेंटर तर्फे दुर्धर आजाराने सहजीवन जगणाऱ्या वधुवरांचा मेळावा झाला. वधुवर परिचयातून ६ जोडप्यांनी आपला जोडीदार निवडला.
इस्लामपुरात झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ८७ जणांनी हजेरी लावली होती. जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद सपकाळ, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नरसिंह देशमुख,एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीगणेश पवार व डॉ. रामचंद्र मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला.
चंद्रकांत गाडीवडार,रुपाली मोकळे ,बजरंग माळी,शंकर जावळे,प्रवीण गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले.समन्वयक अशोक शिंदे यांनी संयोजन केले.
या मेळाव्यात ५१ पुरुष व ३६ महिलांनी सहभाग नोंदवला.एचआयव्हीबाधितांनाही चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.समाजात त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांचा जोडीदार होण्यासाठी एचआयव्ही संसर्ग नसलेली व्यक्ती तयार होणे सध्या तरी अवघड दिसते आहे. अशा परिस्थितीत आपल्यासारखेच आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींशी त्यांची गाठभेट घालून द्यावी,या हेतूने हे व्यासपीठ दिले गेले.
एआरटी सेंटरच्या औषधोपचारांमुळे एचआयव्ही संसर्गित लोकांचे आयुष्यमान वाढले आहे. ते सामान्यांप्रमाणेच काम करू शकतात. मात्र एचआयव्हीबद्दल आजही समाजात नकारात्मकतेची भावना आहे. त्यामुळे हा आजार असलेले रुग्ण समाजापासून वेगळे पडतात. काही वेळा या आजारात जोडीदार गमावला जातो. लहान वयात आजार झाल्याने पुढचे संपूर्ण आयुष्य एकटय़ाने काढावे लागते. त्यामुळे त्यांना जोडीदार शोधण्यासाठी वधुवर मेळावा घेण्यात आला होता.
समन्वयक अशोक शिंदे
जोडीदाराचा शोध घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. मानसिक आधाराची गरज प्रामुख्याने अधोरेखित केलेली होती. जोडीदार कोणत्याही वयात निवडता येतो. शारीरिक संबंधांसोबतच मानसिक आधार ही एचआयव्हीबाधितांची प्रमुख गरज आहे. यासाठी जोडप्याचे समुपदेशन केले जाणार आहे. संसर्ग असलेले मूल जन्माला येऊ नये, अशीच आमची भूमिका आहे. मात्र प्रत्येक एचआयव्हीबाधितासाठी स्थिती वेगळी असते. काही वेळा मूल होऊ देणे शक्य असते. मुलामध्ये या आजाराचा संसर्ग होणार नाही, याची खात्री डॉक्टरांनी दिल्यानंतरच हा पर्याय स्वीकारता येईल.
डॉ.नरसिंह देशमुख
वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर











































































