Last Updated on 30 Jun 2022 8:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
शिवसेना नेते एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.
“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…” असं म्हणत शिंदेंनी गोपनीयतेची शपथ घेतली. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथग्रहण केली.



राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
एकनाथ शिंदे हे अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) गावचे सुपुत्र आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 ला झाला.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव.लहानपणीच ते ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यातील मंगल हाईस्कूल शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले. पुढे त्यांनी ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला. यादरम्यान वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1984 साली त्यांना किसन नगर येथील शाखाध्यक्ष पद मिळाले.
राजकीय प्रवास थक्क करणारा
रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. तसेच, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला. राज्यातील विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे. यामुळेच शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते ८० च्या दशकापासून शिवसेनेत सक्रिय असून साधा शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख,२००४ पासून ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. २०१४ साली विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाममंत्री, २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्यमंत्र्यांची देखील जबाबदारी सांभाळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम पदावर काम केले आहे.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द
ठाणे महापालिकेत 1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता.
2004, 2009,2014,2019 चार वेळा कोपरी-पाचपाखाडीचे आमदार.
2014 ते 2019 विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.
12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेते.
5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)
जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड;
डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)
30 जून 2022 पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
















































































