Last Updated on 01 Dec 2023 10:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजू शेट्टींनी फुंकले ऊस दर आंदोलनाचे रणशिंग
सांगली | कोल्हापूरनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. शुक्रवारी ऊस दरासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपासाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारुन गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यामध्ये हा प्रकार घडला.राजू शेट्टी यांनी राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या दारात ठिय्या ठोकत आपला इरादा स्पष्ट केला आहे.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.मागील अनेक दिवसांपासून स्वाभिमानीकडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे.राजारामबापू साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काटा बंद करण्यासाठी साखर कारखान्याच्या परिसरात घुसले.यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली.परंतु स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीत उड्या मारत ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न केला.यामुळे कारखाना परिसरात तणाव निर्माण झाला.

राजू शेट्टी कार्यकर्त्यांसोबत काटाबंद आंदोलन ठिकाणी दाखल झाले.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.कारखानदारांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.राजारामबापू कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 57 कोटी रुपयांचा हिशेब द्यावा, इतर कारखाने ज्यादा दर देण्याच्या तयारीत असताना जयंत पाटील त्यांच्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत ‘स्वाभिमानी’ची बैठक फिस्कटली राजारामबापू साखर कारखान्याकडून 3100 रुपये पहिली उचल आणि गत हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला.मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
राजू शेट्टी यांची फेसबुकवर पोस्ट
राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा पक्ष झाला आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायच वाकून ही भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्याच कारखान्यावर शेतकरी घामाच्या दामासाठी चिखलात बसला आहे. ज्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे पाप केले. त्यावेळी तुम्ही त्यांना पाठिंबा देत तोंड बंद करून बसलात. आज कारखाना सुरू होवून जवळपास एक महिना झाला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न देण्यासाठी सत्ताधारी व विरोधी कारखानदारांना एकत्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नागवं करण्यात येत आहे. यामुळे ज्यांना स्वत:च्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नसेल त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय हक्काची लढाई शिकवू नये.













































































