Last Updated on 04 Dec 2024 6:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पुणे जिल्ह्यातील पाच सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांच्या ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली आहे. साखर आयुक्तालयाकडून १७५ साखर कारखान्यांना यंदा गाळपाचे ऑनलाइन परवाने देण्यात आले. पुढील पंधरा दिवसांत गाळप वाढून साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
मागील पंधरा दिवसांत नऊ साखर कारखान्यांनी सुमारे सात लाख ४० हजार ४१२ टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून पाच लाख १९ हजार ६८३ क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे.पुणे जिल्ह्यात गाळप हंगामात सुमारे एक कोटी ४९ लाख १६ हजार २९७ टन ऊसाचे गाळप अपेक्षित आहे. यंदा १५ लाख टन जादा ऊसाचे गाळप अपेक्षित आहे.
राज्यातील उस गाळप हंगामाने वेग घेतला असून, मागील पंधरवड्यात ४७.१७ लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ७.९ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ३३.४६ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सध्या १०७ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू असून, परवाने घेतलेल्या ६८ कारखान्यांतील गाळप सुरू होण्याची प्रतीक्षा असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.











































































