Last Updated on 16 Nov 2025 6:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तडीपार–मोक्का गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा
सांगली । तडीपार आणि मोकासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेले गुंड, गुन्हेगार शहरात राजरोस फिरत आहेत. हेच गुंड तुमच्याकडे मते मागायला येऊ शकतात. मात्र शहरातील सुज्ञ जनता हे शहर गुंडांच्या ताब्यात देणार नाही, याची मला खात्री आहे. या शहराचा गेल्या ९ वर्षात खुंटलेला विकास पुन्हा गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी स्वतः दर आठवड्यास नगरपालिकेत बसून शहरातील जनतेचे प्रश्न आणि शहरातील विकास कामे मार्गी लावणार आहे, असा विश्वास माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी कचेरी चौकात आयोजित जाहीर सभेत आ.पाटील बोलत होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ॲड.मनिषा रोटे, नंदकुमार कुंभार, राजेंद्र शिंदे, महेश पाटील, एल.एन.शहा, विजय कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, बी.ए. पाटील, प्रा.शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, पै.भगवान पाटील, अरुणादेवी पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, डॉ.संग्राम पाटील, संदीप पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

उरूण ईश्वरपूर येथील प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास यांच्याकडे उमेदवारी अर्ज देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे. समवेत माजी मंत्री आ.जयंत पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर.
आ.पाटील म्हणाले, परवा पालकमंत्री आपल्या शहरात येऊन गेले. ते म्हणतात आमच्या लोकांना निवडून द्या,आम्ही या शहरातील भुयारी गटारी,२४ तास पाणी,रस्ते आदी विकास कामे मार्गी लावू. गेल्या ९ वर्षात तुमचीच सत्ता आहे, मग ही विकास कामे का केली नाहीत? या शहराच्या नांव बदलासाठी बाळासाहेब पाटील(धनी) व उरूण परिसरातील सर्व भावाक्या व समाजानी आंदोलन केले आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले, मात्र शहराच्या नावात उरूणचा समावेश झालेला नाही. त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये.
आम्ही सत्ता असताना भुयारी गटारी योजना,पाण्याची योजना मंजूर करून आणली. रस्त्याच्या कामांसह शहरातील अनेक विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. सत्ताधारी मंडळी शहरातील विकास कामे पूर्ण करू शकले नाहीत. उलट त्यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. डेंग्यू,मलेरिया, चिकन गुणियासारख्या आजारांनी शहरवाशीय त्रस्त असून पिण्याचे पाणी, शहरातील बागा तीन आणि विकास कामांचे तीन तेरा वाजले आहेत. आम्ही शहराचा खुंटलेला विकास पुन्हा गतिमान करू. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे हे अनुभवी, संयमी आणि निष्ठावंत आहेत. त्यांच्या उमेदवारीस जनतेतून उत्स्फूर्त मिळत आहे.
आनंदराव मलगुंडे म्हणाले, गेल्या ३५ वर्षापासून नगरसेवक म्हणून या शहराची प्रामाणिक सेवा केली आहे. आ.जयंत पाटील व आपण सर्वांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखविला आहे,तो रात्रंदिवस काम करून सार्थ करू.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेत्या ॲड. मनिषा रोटे, नंदकुमार कुंभार यांनी आ.जयंत पाटील व आमचे नेते आ.विश्वजित कदम, खा.विशाल पाटील यांची चर्चा झाली आहे.आम्ही आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर रहाणार राहू, अशी ग्वाही दिली
महेश पाटील म्हणाले, या शहरात गुंडांच्या टोळ्या सक्रीय होत असतील, तर आमच्या माता-भगिनींचे रक्षण कसे करणार? माझे कुटुंब गेल्या ४०-५० वर्षापासून अन्याय – अत्याचाराच्या विरोधात लढत आहे. आम्ही हे मोडून काढू.
एल.एन.शहा म्हणाले, मी स्वगृही आलो आहे. या शहराच्या विकासाला फक्त आ. जयंतराव पाटीलच गती देऊ शकतात.
याप्रसंगी पै.भगवान पाटील,अरुणादेवी पाटील,खंडेराव जाधव,दादासाहेब पाटील, डॉ.संग्राम पाटील,संदीप पाटील यांचीही भाषणे झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ॲड.धैर्यशिल पाटील, रणजित मंत्री, सुभाषराव सुर्यवंशी, अरुण कांबळे, पुष्पलता खरात, रोझा किणीकर, धनंजय कुलकर्णी, शंकरराव पाटील, संजय पाटील(धनी), पिरअली पुणेकर, अशोक उरूणकर, अनिल पावणे, दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले. संचालक शैलेश पाटील यांनी सूत्र संचालन केले.












































































