Last Updated on 21 Dec 2025 9:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
➤ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सभाही निष्फळ
➤ नगराध्यक्ष पदासह २२ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दणदणीत विजय
➤ समर्थकांचा जल्लोष; फटाके, गुलाल आणि घोषणांनी शहर दणाणले
सांगली । पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आ.जयंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष पद व २२ नगरसेवक भरघोस मतांनी निवड़ून आणत भाजप मित्रपक्षांना जबरदस्त धक्का दिला आहे. आ. जयंतराव पाटलांच्या धुरंधर चालीसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होवूनही भाजप महायुतीचे स्थानिक नेते अपयशी ठरले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत प्रचाराची रणधुमाळी उठवूनही भाजपा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. गेलेली सत्ता परत मिळवत जयंत पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली. विजयानंतर आ.जयंतराव पाटील समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलाल उधळत घोषणाबाजीने शहर दणाणून सोडले.

आज सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. आजच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदासह २३ जागा निवडून आल्या. तर भाजप ३, राष्ट्रवादी (अजीत पवार गट) ३ व शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) २ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या आनंदराव मलगुंडे यांना एकुण २६ हजार ६२६ मते मिळाली. तर विरोधातील भाजपच्या विश्वनाथ डांगे यांना १९ हजार २९७ मते मिळाली. मलगुंडे ७३२९ मतांचे मताधिक्य मिळाले.
मत मोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच आनंदराव मलगुंडे यांना मताधिक्य मिळत राहिले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष व भाजपचे नेते विक्रम पाटील, उपाध्यक्ष वैभव पवार, माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील या नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर प्रमुख विजयी उमेदवारांच्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी नगराध्यक्ष प्रा अरुणादेवी पाटील, सुभाष सूर्यवंशी, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, शुभांगी शेळके, सविता पाटील, सुप्रिया पाटील आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचे धाकटे बंधू सुनील मलगुंडे हे प्रभाग १३ मधून विजयी झाले आहेत. त्यामुळे सभागृहात दोन भाऊ असणार आहेत.
प्रभाग निहाय उमेदवारांना मिळालेली मते अशी…
प्रभाग एक – सचिन कोळेकर (१०८२) विजयी विरुध्द विजय कुंभार (१०५८), सुप्रिया पाटील (११२५) विजयी विरुध्द प्रेरणा परीट (१००५), प्रभाग दोन – लता कुर्लेकर (२२२८) विजयी विरुध्द प्रतिभा पाटील (१०४९), संग्राम बबनराव पाटील (२२७८) विजयी विरुध्द सुजित थोरात (११०७), प्रभाग तीन – शुभांगी शेळके (१५९०) विजयी विरुध्द गीता बेलवलकर (६२३), खंडेराव जाधव (१५९९) विजयी विरुध्द शकील सय्यद (६१०), प्रभाग चार – विद्या पवार (२१७८) विजयी विरुध्द दिव्या जाधव (१०२३), अजीत पाटील (२०९५) विजयी विरुध्द दादासो पाटील (१०७१), प्रभाग पाच – अरुणादेवी पाटील (१९३४) विजयी विरुध्द सोनिया गायकवाड (१३६२), सतेज पाटील (२१७२) विजयी विरुध्द संजय पाटील (१४२०), प्रभाग सहा – पुष्पलता खरात (२०७२) विजयी विरुध्द सुजाता टिबे (१४६५), लिलाचंद रायगांधी (२११८) विजयी विरुध्द वैभव पवार (१६२७), प्रभाग सात – पल्लवी नागे (१४९६) विजयी विरुध्द वैष्णवी आजमाने (१२७१), आनंदराव पवार (१४९३) विजयी विरुध्द संग्राम दिलीपराव पाटील (१२६४), प्रभाग आठ – सुभाष सूर्यवंशी (१४६३) विजयी विरुध्द राहुल सूर्यवंशी (१२१७), रेखा जाधव (१३७२) विजयी विरुध्द तेजस्विनी पाटील (१२४६), प्रभाग नऊ – सचिन हांडे (२०२३) विजयी विरुध्द सिध्दार्थ कांबळे (१०८३), सविता पाटील (१५०१) विजयी विरुध्द अर्चना पाटील (८९८), प्रभाग दहा – जरिना पुणेकर (१८९४) विजयी विरुध्द मिसबाह पटवेकर (१३६५), शिवाजी जाधव (१७९०) विजयी विरुध्द विक्रम पाटील (१४७८), प्रभाग अकरा – जावेद मोमीन – इबुशे (१०६०) विजयी विरुध्द स्वप्नील टिबे (९१५), मनिषा कुरळपकर (१०६५) विजयी विरुध्द साबिया डाके (८७२), प्रभाग बारा – कांचन कोळेकर (२०८२) विजयी विरुध्द सरमीन पटवेकर (११९३), स्वरुप मोरे (१९६७) विजयी विरुध्द अक्षय पाटील (११०४), प्रभाग तेरा – सुनिल मलगुंडे (१९२९) विजयी विरुध्द मन्सुर मोमीन (१३९९), अनिता ओसवाल (२०८६) विजयी विरुध्द संगीता शहा (१२३१) , प्रभाग चौदा – राजवर्धन पाटील (२१७१) विजयी विरुध्द शहाजी पाटील (१४६२), सुवर्णा पाटील (२०००) विजयी विरुध्द स्वाती बजबळकर (१६४६), प्रभाग पंधरा – संध्या कांबळे (१९६०) विजयी विरुध्द प्रिया कांबळे (१७२४), संदीप माने (१८५३) विजयी विरुध्द अक्षय कोळेकर (१७३७)
थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रभागनिहाय पडलेली मते अशी –
आनंदराव मलगुंडे – एकुण मते – २६,६२६ – प्रभाग एक – १०७७, दोन – २३६३, तीन – १५७७, चार – १४८५, पाच – २११४, सहा – १८९६, सात – १४३४, आठ – १५२०, नऊ – १९८३, दहा – १९६१, अकरा – ११०९, बारा – २१५४, तेरा – १८८१, चौदा – १९४४, पंधरा – २१२८ (मताधिक्य – ७३२९)
विश्वनाथ डांगे – एकुण मते – १९२९७, प्रभाग एक – १००७, दोन – १०८६, तीन – ५९८, चार – १६७५, पाच – १४८५, सहा – १९२२, सात – १२४७, आठ – ११२१, नऊ – १२६८, दहा – १३१७, अकरा – ८५०, बारा – १०७७, तेरा – १३९१, चौदा – १६३०, पंधरा – १६२३
निकाल जाहीर झाल्यानंतर आ.जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील हे तहसील कचेरी चौकात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी कारखाना कार्यस्थळावर जावून लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.







































































