Last Updated on 18 Sep 2023 11:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पिंपरी ! विशेष प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेठ नाका येथे सभा घेतली.या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (खा. शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधकांना ताकद देणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले होते.उपमुख्यमंत्री पवारांनी दिलेल्या आव्हानाला जशास तसे उत्तर देण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात पवार समर्थक असलेले माजी नगरसेवक तुषार कामठे यांनाच जयंत पाटील यांनी गळाला लावले आहे.कामठे यांना पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची (खा. शरद पवार गट) जबाबदारी दिली आहे.
कामठे यांना शनिवारी (दि. 16) नियुक्ती पत्र देखील दिले आहे.तसेच शहरात लवकरच राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय सुरु करून त्याचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्याला जयंत पाटील यांनी सुरुवात केल्याचे हे सुतोवाच असल्याचे बोलले जात आहे.
2 जुलै 2023 रोजी अजित पवार हे समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण पक्ष संघटना त्यांच्यासोबत गेली आहे.मात्र नव्याने कार्यकर्ते,पदाधिकारी तयार करायला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरुवात केली आहे.अजित पवार यांच्या विरोधात एक शब्दही न काढणाऱ्या बालेकिल्यालाच जयंत पाटील यांनी सुरुंग लावला आहे.खासदार शरद पवार यांच्या विचारांचे पदाधिकारी तयार करण्याकडे पाटील यांनी लक्ष दिले आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहराध्यक्षपदी अजित पवार समर्थक माजी नगरसेवकच फोडण्याचे काम पाटील यांनी केले आहे.शहराध्यक्ष पदासाठी पाच माजी नगरसेवकांनी मुलाखती दिल्याची चर्चा आहे. त्यामध्ये माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली.या बरोबरच जयंत पाटील यांनी शहरात येणाऱ्या पिंपरी,चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात निरीक्षक नेमून त्यांना ताकद दिली आहे.ते पक्ष संघटन वाढवत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत देखील कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त ठेवण्याचे काम राष्ट्रवादीने केले.तर सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पाठिशी अबाधित ठेवण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना यश आले.पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमेव नेतृत्त्व असल्याचे चित्र होते.मात्र त्याला छेद देण्याचे काम जयंत पाटील यांनी माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या निमित्ताने केले आहे.कामठे यांनी राष्ट्रवादीतील 60 टक्के नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे.कामठे हे स्थानिक नेतृत्त्व आहे.शिवाय मराठा समाजाचा चेहरा आहे.त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली ताकद ही आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढविणार असल्याची राजकीय वस्तूस्थिती आहे.
कार्यालयाच्या उद्धाटनाची जोरदार तयारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता शरद पवार गटाने पक्ष कार्यालय थाटले आहे.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने काळेवाडी येथे पक्ष कार्यालय उभारले असून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.या कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत.या फ्लेक्समधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो वगळण्यात आला आहे.खा. शरद पवार आणि जयंत पाटलांचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यालय उभारुन शरद पवार गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
कामठे विधानसभेवर दावा करणार ?
माजी नगरसेवक कामठे यांचा प्रभाग चिंचवड विधानसभेत येतो. सध्या या मतदारसंघातून भाजपाच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार आहेत. महायुतीमध्ये हा मतदारसंघ विधानसभेला भाजपासाठी सोडला जाणार हे निश्चित. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात खा. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असणार हे निश्चित आहे. ही संधी ओळखून कामठे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोष अंगावर घेऊन शहराध्यक्ष पद घेतलेच. मात्र आगामी निवडणूकीत चिंचवड विधानसभेसाठी देखील ते दावा करतील,असा अंदाज आहे.
साभार : ePaper महाईन्यूज










































































