Last Updated on 04 Dec 2024 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह देशभरातील बडे नेते, कलाकार, उद्योगपती असे ६० हून अधिक व्हीआयपी सहभागी होणार आहेत. हा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजल्यापासून मुंबईतील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे.
आझाद मैदान परिसर नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केला आहे. सीएसएमटीचा भुयारी मार्गातील सर्व दुकाने आजपासूनच बंद ठेवण्यात आली आहेत. आझाद मैदान परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिका मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून ती इतरत्र मार्गावर वळवण्यात आली आहे.
महापालिका मार्ग – वासुदेव बळवंत फडके चौक धोबी तलाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरील बस त्या कालावधीत दोन्ही दिशेला धोबी तलाव महात्मा फुले मंडई मार्गे वळवण्यात येतील.
तसेच गरज असेल तेव्हा पूर्णपणे बंद राहणार आहे. लोकमान्य टिळक मार्ग – चाफेकर बंधू चौक ते ते वासुदेव बळवंत फडके चौक धोबी तलाव यादरम्यानचा हा फॅशन स्ट्रीट मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल त्यामुळे तेथून जाणाऱ्या बस या दरम्यान धोबी तलाव , महात्मा फुले मंडई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खादी भांडार मार्गे हुतात्म्या चौकात जातील.
साभार : प्रसार भारती












































































