Last Updated on 12 Oct 2023 7:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ठाणे । केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा पिक पेरा ई पीक पाहणी अॅपवर नोंदविणे आवश्यक आहे. खरीप हंगाम 2023 च्या ई-पीक पाहणीची कार्यवाही 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी,असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
ई-पीक पाहणीच्या नोंदी या पिक विमा दावे निकाली काढण्यासाठी,पीक कर्ज वाटप,प्रधानमंत्री किसान योजना,यांत्रिकीकरण, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई व शासनाच्या विविध योजना ई. बाबींसाठी अनिवार्य आहे.त्यामुळे प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. चालू खरीप हंगामात पिक पेरा नोंदविण्यासाठी सुरवात 1 जुलै 2023 पासून सुरु झाली आहे.
गेल्या वर्षीच्या अॅपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अॅप (2.0.11) यावर्षी सुरू करण्यात आलेले आहे.नवीन सुविधांमध्ये पुढील सुविधांचा समावेश आहे.शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीबाईल अॅपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी 48 तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई- पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्या आधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपआप होणार आहे. खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पिक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी 10 टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे.तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होतील.पीक पेरा नोंदवण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2023 आहे.तरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नुकसान भरपाई मदत व किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदीच्या लाभाकरीता शेतकऱ्यांनी आजच पिकांची नोंद मोबाईल अॅपद्वारे करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी केले आहे.











































































