Last Updated on 02 Mar 2022 9:25 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
इस्लामपूर येथील प्रकाक्ष हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये काम करणार्या डॉक्टर्स,नर्सेस व इतर सहकारी कर्मचार्यांच्यावर दाखल होत असलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या प्रवेशव्दारासमोर प्रकाश कामगार युनियनच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.इस्लामपूर यावेळी आम्ही कोरोना योध्दा, आम्हाला न्याय दया, आमच्या सहकारी स्टाफवर दाखल केलेले खोटे गुन्हे, मागे घ्या, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हुकुमशाहीचा धिक्कार असो, पोलिस मित्रानो राजकीय दबावाला बळी पडु नका अशा घोषणा देऊन कामगारांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली.
प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये कोरोनाच्या संकटकाळात १५१५ रूग्णांवर उपचार करण्यात आले. ॲट्रासिटी सारखा गुन्हा हॉस्पिटलमधील डॉक्टर व सहकारी स्टाफवर दाखल झाला होता. हा ही गुन्हा खोटा व राजकीय व्देषातुन दाखल करण्यात आल्याचा आरोप प्रकाश कामगार युनियनच्या पदाधिकारी यांनी केला होता. यावेळी कामगारांनी प्रशासन व राजकीय व्यवस्थे विरोधात आंदोलन उभा केले होते. यावेळी मा. उच्च न्यायालयाने हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर स्टाफला दिलासा दिला होता.
काही दिवसापुर्वी हॉस्पिटल प्रशासन विरोधात योगेश आनंदा खोत रा. पडवळवाडी यांनी तब्बल १० महिण्यानंतर माझी फसवणुक केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली, आणि पुन्हां पोलिसांनी त्या अनुषगांने हॉस्पिटल प्रशासनाकडे आपला तपासाचा मोर्चा वळवला. योगेश खोत हा पालकमंत्री जयंत पाटील यांचा समर्थक व राष्ट्रवादी पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता असल्याचे सांगत राजकीय व्देषापोटी पोलिस प्रशासनावर दबाव आणुन गुन्हा दाखल करण्याची मालिका राष्ट्रवादी व पोलिस प्रशासनाने संगनमताने चालू केल्याचा आरोप आज झालेल्या पहिल्या दिवसाच्या उपोषणात प्रकाश कामगार युनियनच्या कामगारांनी केला.
पोलिस प्रशासने राजकीय दबावाला बळी न पडता तक्रारीची सत्यता पडताळुन गुन्हा दाखल करून घ्यावा व तक्रारीच्या अनुषगांने तपास करावा पोलिस उपचार घेतलेल्या सर्व रूग्ण व नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलवून तक्रार देण्याबाबत त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. हि अत्यंत बेकायदेशीर असून या चुकीच्या कार्यपध्दतीचा हॉस्पिटलमध्ये काम करणार्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफला मानसिक त्रास होत आहे. असे मत आपल्या मनोगतात कामगार युनियनचे पदाधिकारी रणजित पाटील, कुलदीप खांबे, सुजित पाटील, दिपक सराफदार, सुदर्शन जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी पोलिस व आरोग्य अधिकार्यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा धिक्कार असो अशा घोषणा ही देण्यात आल्या, यावेळी प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर सहकारी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांनी या उपोषणात आपला सहभाग नोंदविला.










































































