Last Updated on 16 Dec 2024 9:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांचे निर्देशानुसार शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजित करण्यात आलेले होते. लोकअदालती मध्ये न्यायालयातील प्रलंबित २१८ प्रकरणामध्ये तडजोडी होवून ७ कोटी ७२ लाख १२ हजार ५७४ रुपये तर दावादाखल पूर्व ६७ प्रकरणामध्ये तडजोड होवून १ लाख ८३ हजार ६५५ रुपये एवढी रक्कम वसुल झाल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश १ अनिरुध्द सुभाष गांधी यांनी दिली.
एकूण २१८ प्रकरणामध्ये तडजोडी होवून रुपये ७ कोटी ७२ लाख १२ हजार ५७४ रुपयेची प्रकरणे तडजोडीतून निकाली झाली. यामध्ये वाळवा तालुक्यातील सहकारी संस्था, इन्शुरन्स कंपनी, एम.एस.ई.बी., राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, नगरपालिका, ग्रामपंचायती, फायनान्स कंपन्या तसेच तालुका मधील सर्व पोलीस स्टेशन यांनी सहभाग घेतलेला होता.
सदर लोकन्यायालयामध्ये पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ अनिरुध्द सुभाष गांधी, जिल्हा न्यायाधीश- २ ए.वाय. थत्ते, सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व्ही.जी. चौखंडे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एम.एन. जयस्वाल, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर पी.पी. ठाकूर, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर के. एम. चंडालिया यांनी काम पाहिले.
तसेच पॅनेल सदस्य म्हणून इस्लामपूर वकील संघटनेचे सदस्य ॲड. वैभव व्ही. कुलकर्णी, ॲड. दिग्वीजय डी. पाटील, ॲड. व्ही.व्ही. बोंगाळे, ॲड. एस.एम. नवाळे, ॲड. व्ही. आर. चव्हाण, ॲड. एस.एच. हळदे-पाटील यांनी काम पाहीले. न्यायालयातील सर्व कर्मचारी व इस्लामपूर वकील संघटनेचे सर्व विधीज्ञ यांनी सहभाग नोंदविला. सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वाळवा तालुक्यातील पक्षकारांनी मोठ्या संख्यने सहभाग नोंदवला व राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करणेस हातभार लावला. सदरची लोक अदालत पी. के. शर्मा, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली.








































































