Last Updated on 05 Nov 2024 4:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
४० वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली । इस्लामपूर क्रिकेट असोसिएशन आयोजित इस्लामपूर प्रीमिअर क्रिकेट लिग स्पर्धेत सूर्या इलेव्हनने पंत इलेव्हनचा ३६ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
इस्लामपुरातील उरण परिसरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ४० वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या.आठ संघ साखळी पद्धतीने खेळले. उपांत्यपूर्व सामने बाद पध्दतीने झाले. सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धा उत्साहात झाल्या. चार दिवस चाललेल्या
या स्पर्धेत ४० वर्षांवरील १२० खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य पणाला लावले. जेष्ठ खेळाडू मामा इटकरकर,मिलींद कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गजाजन पोतदार व सर्व संघ मालकांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
अंतिम सामन्यात सूर्या इलेव्हनने प्रथम फलंदाजी करतांना ७८ धावा केल्या. यात विनोद शिंदे यांनी १८ बॉल ४४ धावा केल्या. त्याला प्रति उत्तर देतांना पंत इलेव्हनचा सर्व संघ ४२ धावांत गारद झाला. सूर्या इलेव्हनच्या विजय पाटील यांनी चांगली गोलंदाजी करत सलग चार चेंडूत चार विकेट घेतल्या. सूर्या इलेव्हनने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात विनोद शिंदे सामनावीर ठरले.
सकाळच्या सत्रात पहिल्या उपांत्य लढतीत जडेजा इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात ५१ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल पंत इलेव्हन संघाने सहाव्या षटकात सहज विजय मिळवला. १८ बॉल ३७ धावा आणि दोन विकेट घेणारा अष्टपैलू विरेश देवळालकर सामनावीर ठरला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सूर्या इलेव्हन संघाने विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. विराट इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी केली. आठ षटकात ४२ धावा केल्या होत्या. सूर्या संघाने सहाव्या षटकात हे आव्हान सहज पूर्ण करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. संतोष परिटने २६ धावा केल्या. अष्टपैलू खेळी करणाऱ्या जहांगीर नरंदेकर सामनावीर ठरला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना जडेजा इलेव्हनने ३६ धावा केल्या. विनोद मोहिते यांनी १३ धावा केल्या. विराट संघाने पाचव्या षटकात सामना सहज जिंकला. जयवंत पाटील यांनी २६ धावा करत सामनावीरचा पुरस्कार मिळवला.
या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी व खेळाडूंनी संयोजन केले.
विजेता संघ : सूर्या इलेव्हन,
उपविजेता संघ : पंत इलेव्हन
तिसरा क्रमांक : विराट इलेव्हन
चौथा क्रमांक : जडेजा इलेव्हन
सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळाडू अनुक्रमे वयोगट ४० ते ४५ वर्षे, ४५ ते ५० व ५० वर्षावरील खेळाडू असे ; गोलंदाज ; प्रभाकर मस्के, विजय पाटील, निवास पाटील.
फलंदाज : हर्षल समुद्रे , संग्राम सावंत, विनोद शिंदे, क्षेत्ररक्षक ; संग्राम कुंभार, संदिप खुडे, सुहास पाटील. विकेट किपर ; संतोष परीट
मॅन ऑफ दी सीरिज : विरेश देवळालकर
सर्वोत्तम संघभावना : जडेजा इलेव्हन
सर्वोत्तम झेल : उदय इटकरकर












































































