Last Updated on 07 Jul 2025 10:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आमदार सदाभाऊ खोत यांचा पुढाकार
सांगली । जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीस आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अवर सचिव शि. म. धुळे, सांगली जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
इस्लामपूर सारख्या औद्योगिक शहरात तसेच लोकसंख्येचा विचार केल्यास त्याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना वेळीच आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याअनुषंगाने ट्रॉमा केअर सेंटरसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात यावा व त्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. ट्रॉमा केअर सेंटरसाठी नवीन प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यावर तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे आश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांना बैठकीदरम्यान मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले आहे.












































































