Last Updated on 29 Jun 2023 4:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चिमुकल्यांचा वारी सोहळा रंगला.विठ्ठल -रुक्मिणी सह वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेल्या मुलांनी झिमझीम पावसाच्या वातावरणात विठ्ठल नामाचा गजर केला.
इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये खेळातून आणि प्रत्यक्ष अनुभव देत शिक्षण दिले जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी काढण्यात आली.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या दिंडीत नामस्मरण आणि टाळमृदंगाच्या गजरात मुलांनी आनंद व्यक्त केला.विविध संतांच्या वेशभूषेमध्ये मुलं-मुली आली होती. गळ्यात टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन साडी परिधान करून आलेल्या लहान मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठलाच्या नामस्मरणात नाचत त्यांनी फुगड्या घातल्या.धोतर,शर्ट घातलेली मुले हातात पताका घेऊन होती.
या दिंडी सोहळ्यात विठ्ठलाची पालखी घेऊन मुलं अग्रभागी होते.विठ्ठल रुक्मिणीच्या भूमिकेतील चिमुकल्यांच्या वेशभूषा लक्षवेधी होत्या.संत तुकाराम,ज्ञानेश्वर,एकनाथ,नामदेव,वासुदेव,जनाबाई,मुक्ताबाई,आवली यांच्या वेशभूषा केल्या होत्या.अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्याने भिजत मुलांनी दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.
संचालिका सौ. वर्षाराणी मोहिते म्हणाल्या ,दिंडीची असणारी परंपरा समाजाला योग्य व विधायक दिशा देण्याचे कार्य करीत असते.गावोगावीच्या दिंडीमुळे समाजात संतांच्या थोर विचारांची पेरणी होते.या परंपरेमुळे गावोगावच्या नागरिकांमध्ये चैतन्य व उत्साह निर्माण होत असतो.याची जाणीव लहानपणीचा व्हावी यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
वर्षाराणी मोहिते यांनी दिंडीचे पूजन केले.धनश्री पाटील,तेजस्विनी ताटे,मोनाली धोत्रे ऋतुजा धनवडे,नंदा सोनवणे यांनी संयोजन केले.














































































