Last Updated on 24 Oct 2024 3:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महायुती घटकपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने अर्ज केला दाखल
मतदार संघाच्या विकासाचे व्हीजन घेऊन मी निवडणुकीला सामोेरे जात आहे, जनतेने मला आशीर्वाद द्यावा – निशिकांत भोसले पाटील
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी महायुती घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने दाखल केला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपाचे जेष्ठ नेते सी.बी.पाटील,भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील प्रमुख उपस्थित होते.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात गेली ३५ वर्षे येथील अकार्यक्षम नेतृत्वामुळे मतदार संघाचा विकास रखडला. ऊसदर, दूध उत्पादकांचे प्रश्न, युवकांची बेरोजगारी, अशा विविध प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे. मला खात्री आहे की, ही निवडणूक राज्यातील ऐतिहासिक निवडणूक होईल. हा तालुका क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने चालणारा तालुका आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच क्रांती घडलेली दिसून येईल. कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. २०१६ लाही इस्लामपूर नगरपालिका निवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्यानंतर ३१ वर्षांची प्रस्थापितांची सत्ता जनतेने पलटी केली होती. याच भावना आता मतदारसंघातील ५७ गावातून दिसून येत आहे. समाजकारणातुन राजकारण हा माझा प्रवास मतदार संघातील जनतेने अनुभवला आहे,येथील व्यवस्था बदलयाची आहे,प्रत्येकाला मान,सन्मान मिळालयला हवा,मतदार संघाचे विकासाचे व्हिजन घेऊन मी मतदारांच्या समोर जात आहे. या निवडणुकीत जनतेने मला आशीर्वाद द्यावेत. नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र राहून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ विकसित करेन, असा मी जनतेला शब्द देतो.
सी.बी.पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील जनता प्रस्तापिताना धडा शिकवण्यासाठी आसुसलेली आहे. महायुतीत कोणताही दुरी किंवा बे-बनाव नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत होईल. एकास एक लढतीत महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) हे निश्चित विजयी होतील, यात शंका नाही.
भगवानराव साळुंखे म्हणाले, पंतप्रधान यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. देशाला एक संघ व जागतिक महासत्ता व जगतगुरु बनवायचे असेल तर राज्यात महायुती सरकार असणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासाशी नाते असणाऱ्या महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे.
यावेळी माजी आ.भगवानराव सांळुखे,भाजपा चे जेष्ठ नेते सी.बी.पाटील,भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील,राष्ट्रवादी पक्षाचे विरेंद्र राजमाने,माजी नगरसेवक वैभव पवार,भास्कर कदम,मनसेचे सनी खराडे,दलित महासंघाचे विकास बल्लाळ,डाॅ.विजय चांदणे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील, शहर अध्यक्ष अशोकराव खोत,महिला जिल्हा उपाध्यक्षा आशा पवार,तालुका अध्यक्षा सुरेखाताई जगताप,शहर महिला अध्यक्षा सुनिता काळे,स्मिता पवार,युवा मोर्चा अध्यक्ष सतेज पाटील,कामगार नेते अमित कदम,राहुल पाटील,संजय जाधव,नितीन पाटील,किरण चव्हाण,शेतकरी संघटनेचे रविंद्र पिसाळ,कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक संजय लाखे,पांडुरंग वाघमोडे,मधुकर हुबाले,भास्कर मोरे,सयाजी जाधव,सयाजी पवार,बाळासाहेब कोरे,मोहन वळसे,अजित पाटील,अक्षय पाटील,प्रविण परिट,यदुराज थोरात,रियाज पाटील, ॲड.उमेश कोळेकर,ॲड.सुयोग पाटील,ज्योती कांबळे,प्रतिभा ठाकर,शिल्पा कांबळे,रुपाली शिंदे आदिसह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरच राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार…
आज मुहूर्त असल्याने आप-आपल्या प्रांतात महायुतीतील स्थानिक नेत्यांना घेऊन अर्ज दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून होत्या. त्यामुळे महायुती घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. परंतु दोन-तीन दिवसात राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळी व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहोत, असेही शेवटी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.








































































