Last Updated on 16 Sep 2024 12:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे स्वागत!
सांगली : विजयकुमार शिंदे
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दि. १३ सप्टेंबर २०२४ ला एक महत्वपूर्ण शालेय परिपत्रक जाहीर करण्यात आले. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्वच प्रकारच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन इयत्ता बारावी पर्यंत सर्वच विद्याशाखेत सक्तीचे करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्यासाठी सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ दिनांक ९ मार्च, २०२० आणि मराठी भाषा विभागाने राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तिचे अध्ययन व अध्यापन अधिनियम २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना दिनांक १६ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी दिनांक १ एप्रिल, २०२० पासून करण्यात आली आहे. कोविड २०१९ च्या संसर्गजन्य च्या पार्श्वभूमीवर मराठी विषय सक्तीचा केला पण इयत्ता दहावी पर्यंत मराठी विषयाची परीक्षा गुणांक न ठेवता श्रेणी स्वरूपात करण्याचा निर्णय दिनांक १९ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे. ही सवलत फक्त एका बॅच पुरतीच मर्यादित आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाचे शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी परिपत्रकातील निर्देशानुसार कारवाई करावी असाही आदेश पारित करण्यात आला आहे .
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने २०१० पासून सातत्याने महाराष्ट्रात मराठी विषय हा इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत सक्तीचा व्हावा, यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून मागणी केली होती. महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. महाराष्ट्र शासनाने राजभाषा धोरण ठरवताना व मराठी भाषाविषयक धोरण ठरवताना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व शासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी करिता सर्वच विद्याशाखेत मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्यात आले आहे. तसे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ला माननीय राज्यपालांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले आहे.
ही बाब महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी,मराठी भाषिक लोकांसाठी आनंदाची आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक व महासंघाने यासाठी शासनाचे अभिनंदन केले आहे.











































































