Last Updated on 12 Feb 2025 7:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दि.१४ फेब्रुवारीपासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा,महिलांच्यासाठी रांगोळी स्पर्धा, घरोघरी खाऊ वाटप,तसेच महा रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी दिली.
माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,युवा नेते संदीप पाटील,युवक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सचिन कोळी,जय महाराष्ट्र सूत गिरणीचे अध्यक्ष संजय जाधव,परेश पाटील,राजू बाणेकर,सूर्याजी पाटील,अभिजित पाटील, शकील जमादार,धनंजय पाटील,सूरज कचरे, कुणाल कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले,शुक्रवार दि.१४ ते २० फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत शहरातील ६३ बूथ मधील ६३ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास अँड.चिमन भाऊ डांगे यांचेकडून रु.२५ हजार,दुसऱ्या विजेत्यास उद्योजक सुरेंद्रदादा पाटील यांच्या कडून रु.१५ हजार,तिसऱ्या विजेत्यास माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी यांचेकडून रु.१० हजार,चौथ्या विजेत्यास इंजिनिअर संजय रानमाळे यांच्याकडून रु.७ हजार, तसेच युवा नेते संदीप पाटील यांच्याकडून विजेत्यांना सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यक्तिगत आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ माजी नगरसेवक,राजारामबापू समूहातील संचालक,पत्रकार,पोलीस,डॉक्टर आदी ८ संघातील प्रदर्शनीय सामान्यांनी केला जाणार आहे.
रविवार दि.१६ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत इस्लामपूर शहरातील घरोघरी बुंदी वाटप केली जाणार आहे. रविवारीच शहरा तील महिलांच्या रांगोळी स्पर्धा होणार आहेत. यातील विजेत्या महिलांना प्रभागवार रोख बक्षीस,तसेच सहभागी महिलांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
रविवारी सकाळी १० वाजता कापुसखेड नाका येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी) येथे महा रक्त दान शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात इस्लामपूर शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. साधारण १ हजार बाटल्या रक्त संकलन केले जाणार आहे.












































































