Last Updated on 13 Jul 2024 4:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आषाढी वारीनिमित्त बहे (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गोल रिंगण केले.बालवारकऱ्यांनी हातात टाळ, मृदंग घेऊन विठूनामाचा जयघोष केला.
ज्ञानोबा माऊली…माऊली माऊली..संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले शाळेचे प्रांगण…टाळ-मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले…गावातून काढलेल्या बाल दिंडीमुळे संपूर्ण परिसरही भक्तिमय झाला होता.येथील ग्रामपंचायत परिसरात रिंगण सोहळा पार पडला.
टाळ, मृदुंग, तुळशी वृंदावन, भगव्या पताका इत्यादी हातात धरून नटलेल्या बाल वारकऱ्यांनी रिंगण सजले होते.माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला होता.
विदयार्थ्याना प्रत्यक्ष पालखी सोहळा अनुभवता यावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते..मुख्याध्यापक जयसिंग पाटील,शिक्षक संजय लोंढे,शैलजा पाटील,उज्वला पाटील,सुवर्णा पाटील,शारदा पाटील यांनी संयोजन केले.










































































