Last Updated on 28 Mar 2023 11:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अनेकांना तोंड येण्याची समस्या असते. उन्हाळ्यात तर ती अधिक वाढते. खरंतर शरीरातील उष्णता वाढल्याने तोंडात फोड येणे, जखमा होणे असे प्रकार उद्भवतात.
मात्र, त्यामुळे तोंड येणाऱ्या व्यक्तीच्या जेवणावर परिणाम होतोच. शिवाय वेदनांमुळे तो व्यक्ती पूरता त्रस्त होतो. मात्र, यावर 3 अत्यंत प्रभावी असे घरगुती उपाय असून ते स्वस्त देखील आहेत.
मधामुळे मिळेल आराम
तोंड आल्यानंतर ते कमी करण्यासाठी तसेच दूर करण्यासाठीही तुम्ही मधाचा वापर करू शकतात. मध हे अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असते. तोंड घालविण्यासाठी एका बोटावर मध घेऊन ते तोंड आलेल्या ठिकाणी फोडांवर लावल्यास त्याचा फायदा होईल. मध लावल्यावर तोंडात तयार झालेली लाळ थुंकून न देता ती गिळून घ्यावे. दिवसांतून तीन ते चार वेळा तरी अशा प्रकारे मध लावावे. त्यामुळे तुम्हाला आरा मिळेल.
हळद प्रभावी उपाय
आयुर्वेदात हळद एक औषध म्हणून महत्त्व दिले जाते. तोंड येत असल्यास हळद लावल्यास त्याचा फायदा होतो. तोंड आले असल्यास हळद पावडर घेऊन त्यात थोडं पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट तोंड आलेल्या ठिकाणी लावा. किमान आठवडाभर रोज ही पेस्ट लावल्यास तोंड दूर होण्यास मदत होईल. या पेस्टमुळे तुम्हाला तोंडाच्या संसर्गापासून आराम मिळेल.
मीठाच्या पाण्याच्या गुळण्या
मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्याच्या वापराने तोंड आल्यानंतर त्यामुळे होणारे व्रण बरे होण्यास मदत होते. तोंडात फोड आले असल्यास तुम्ही मिठाचे पाणीही वापरू शकता. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून त्याने चिळ भरावी, यामुळे तोंडात झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
हेही घरगुती उपाय करून बघा
कोमट पाणी
एक ग्लास कोमट पाणी घ्यावे व त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालावे. या पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळेस गुळण्या कराव्यात.
खोबरे
खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्याने देखील तोंडातील फोड किंवा जखमा कमी होण्यास मदत होते.
कोथिंबिरीचा रस
एक चमचा कोथिंबिरीचा रस तोंडात घ्यावा आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवावा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
दही
दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे पोटाची उष्णता कमी होते तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
तुळशीची पाने
तुळशीची पाने चावून खा. तुळशीच्या पानात अँटीबायोटीक्स असतं. याचा रस तोंडातील लाळेत मिसळतो. यामुळे तोंडातील फोड, जखमा बऱ्या होतात.
तुरटी
तुरटीच्या पाण्याने चूळ भरा. तुरटीमध्ये अँटीबायोटीक्स असतं. तुरटीच्या पाण्याने चूळ भरल्याने तोंडाची आग होऊ शकते. मात्र या उपायाने वेदना कमी होतात आणि संसर्ग होत नाही.
(टीप : लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.त्यांचा प्रयत्न करण्यापूर्वी,कृपया तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)











































































