Last Updated on 27 Oct 2024 7:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उल्हासनगर । आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली मोहम्मद खलीद अली याच्यासह पाच जणांच्या टोळीला मुंबई आणि ठाण्याच्या उल्हासनगर भागातून अटक केली आहे. या टोळीकडून दोन हजार २३२ किलोच्या भांगेच्या गोळ्यांसह ३५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली.
उत्तर प्रदेशातून मुंबई, ठाण्यात आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची विक्री होणार असून, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, चेंबूर मुंबई या ठिकाणावरून तिची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने २५ ऑक्टाेबरला चेंबूरच्या सहकारनगर बसस्टॉपसमोर सापळा रचून दोन टेम्पोंची झडती घेतली. या टेम्पोमधून परराज्यात तयार केलेला महाकाल मुनक्कावटी या नावाचा भांगमिश्रित पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात आढळला. त्यानंतर, मोहम्मद खालिद अली आणि इमरान हाफीज खान यांना अटक केली.
त्यांच्याकडील चौकशीत कुर्ला, लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनलच्या पूर्व भागातील रेल्वे स्टेशनच्या पार्सल ऑफिसबाहेरील रस्त्यावर मोकळ्या जागेतून यातील अन्य एक मुख्य सूत्रधार फारुख शेख याच्याकडूनही भांगमिश्रित शिलाजीत वटी पदार्थाचा साठा हस्तगत केला. या प्रकरणात त्याला अटकही केली. त्याच्या चौकशीतून मुंबईतील गिरगाव भागातून शेख शबीर शफील मोहम्मद याच्याकडूनही असाच भांगमिश्रित शिलाजीत वटीचा साठा जप्त करून त्यालाही अटक केली. त्यानंतर, मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्याच्या उल्हासनगर क्रमांक एकमधून रवी कुकरेजा याच्याकडूनही अन्य भांगमिश्रित शिलाजीत वटी नावाचा साठा जप्त करून त्यालाही अटक केली.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत दोन हजार २३२ किलो भांगमिश्रित पदार्थांचा साठा, दोन टेम्पो असा ३५ लाख ७३ हजार ४०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमांसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई निरीक्षक शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळ, रिंकेश दांगट, हनुमंत यादव, जमादार महावीर कोळेकर, जवान केतन वझे, भाऊसाहेब कराड आणि हनुमंत गाढवे आदींच्या पथकाने केली.






































































