Last Updated on 01 Sep 2024 9:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2019-2024 या कालावधीसाठी दिला जाणारा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कार रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील ज्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी वर्गाची लढाई मी सभागृहात लढत होतो, त्यांना हा सन्मान मी समर्पित करत आहे, असे सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (3 सप्टेंबरला) या पुरस्काराचे वितरण होणार असून मुंबई विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, संसदीय परंपरा, शिष्टाचार यांची जाण, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, उपस्थिती, विधिमंडळात प्रश्न, विषय मांडताना वापरलेले कौशल्य, वक्तृत्व शैली, संसदीय भाषणे या सगळ्या बाबी पडताळून या पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून संबधित आमदाराची यासाठी शिफारस केली जाते. त्यानंतर राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात.









































































