Last Updated on 15 Sep 2024 8:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अहमदनगर । आमचं सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिर्डी येथे आयोजित केलेल्या जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले, सुभाष देसाई यांच्यासह जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि हे कर्मचारीच कायमस्वरूपी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकार बनवण्याची ताकद असल्याचे सांगून आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू असे आश्वासन त्यांनी दिले.
नाना पटोले यांची देखील जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा
यावेळी नाना पटोले यांनी देखील पेन्शन योजनेबाबत घोषणा केली. ‘हे सरकार आता सत्तेबाहेर जाणार. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत देखील आज भेदभाव केला जात आहे. राज्यावर 10 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. मंत्री देखील आता तुमच्याकडे येणार अशी माहिती मला मिळाली आहे. आमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेऊ. जाहीरनाम्यात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा राहील’, असं नाना पटोले म्हणाले.











































































