Last Updated on 21 Jun 2023 8:17 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील शिधावाटप अर्थात रेशनिंग दुकानात आता बँकांचेही व्यवहार करता येणार आहेत.रेशनिंग दुकानदारांना अधिकचे उत्पन्न मिळावे तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातही बँकांच्या सेवा मिळावी यासाठी या दुकानांमध्ये बँकींग सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राच्या दळणवळण मंत्रालयाने 2018 पासून देशात इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवा पोस्टाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. त्याच धर्तीवर आता शिधावाटप दुकानातून ही सेवा मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका (अनुसूची -2), आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या सेवा शिधावाटप दुकानात उपलब्ध असतील. या निर्णयामुळे रोकड विरहीत व्यवहार, देयक, भरणा, आरटीजीएस, कर्जसुविधा मिळेल. ओटीपी आणि बायोमेट्रीक प्रणालीव्दारे ही सेवा दिली जाणार आहे.
शिधावाटप दुकानातील बँकींगचे सर्व व्यवहार 100 टक्के डिजिटल असणार आहेत. दुकानदारांना नियमित मासिक कमाईवर काम करण्याची यामध्ये संधी असेल. हे काम ऐच्छिक असणार आहे. यासंदर्भातला करार संबंधित बँक आणि शिधावाटप दुकानदार यांच्यात होईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिधावाटप /रास्त भाव दुकानदारांना होणारा लाभ/संधी
बँकांकडून रास्त भाव दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना प्रदान केलेल्या विविध उत्पादनासाठी वाढीव महसूल प्राप्त होईल.
बँकांमार्फत विविध वित्तीय संस्थांच्या सहयोगाने ग्राहकास कर्ज सुविधा उपलब्ध होतील.
रोखविरहित टायझेशनच्या माध्यमातून सर्व व्यवहार सुलभ, जलद व सुरक्षितपणे करता येतील
“दुकानामध्ये दुकान” (“Shop-in-e-Shop’) अशा प्रकारे रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून विविध उत्पादन/सेवा पुरविल्यामुळे पुरवठा वाढेल.
रास्त भाव दुकानदारांना बँकांसोबत काम करण्याची आणि बँकाची उत्पादने व सेवा वितरीत करण्याची संधी मिळेल.
१०० टक्के डिजिटल व्यवहार
राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका (अनुसूची २ अंतर्गत सूचीबद्ध इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक या विविध बँकांच्या ब्रँडअंतर्गत प्रसिद्धी आणि विपणन
विक्री व्यावसायिक प्रतिनिधी (नियमित मासिक कमाईवर आधारित म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.







































































