Last Updated on 27 Apr 2025 3:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन कैद; वनविभागाने दक्ष राहण्याचे आवाहन
सातारा । आटके (ता. कराड) येथे रविवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आटके ते आटके टप्पा रस्त्यावर एका घराजवळून बिबट्या रस्ता ओलांडून जवळच्या शेतात शिरताना दिसला. याचवेळी त्या रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या एका व्यक्तीसमोरच बिबट्याने रस्ता पार केला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास आटके ते आटके टप्पा रस्त्यावर पैलवान इंद्रजीत शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळून बिबट्या वसंतराव पाटील यांच्या शेतात गेला आहे. याचवेळी सुधीर पाटील हे आपल्या मोटर सायकलवरून चालले होते. त्यांच्या समोरच बिबटया रस्ता ओलांडून वसंतराव पाटील यांच्या शेतात गेला.हे चित्र पैलवान इंग्रजीत पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
बिबट्याच्या वावरामुळे येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वीच आटके गावच्या जाधव मळा वस्तीत बिबट्या व दोन पिल्ले दिसल्याचे ग्रामस्थांनीं सांगीतले.तर आज दिसलेला बिबट्या हा नर असावा व जाधव मळीतील दोन पिल्ले व मादी असावी असा अंदाज येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या वनविभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता दक्षतेने वागण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. अधिकाऱ्यांनी परिसरात तपासणी सुरू केली असून, लवकरच आवश्यक उपाययोजना केली जातील, असे संकेत मिळाले आहेत.










































































