Last Updated on 18 Sep 2023 7:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
छत्रपती संभाजीनगर | सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला.या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले.पण, हा कार्यक्रम चर्चेत आला तो आदित्य नावामुळे!
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला.या प्राणिसंग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिता हिने 7 सप्टेंबर रोजी तीन पांढर्या बछड्यांना जन्म दिला. आज सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिठ्ठी काढत बछड्यांचे नामकरण केले.अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता.त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पण…राजकारणही तापले,हे आहे कारण
पण, हा कार्यक्रम चर्चेत आला तो आदित्य नावामुळे! अजित पवारांनी काढलेल्या एका चिठ्ठीत निघालेल्या आदित्य नावामुळे राजकीय वैराची प्रचिती बघायला मिळाली.या नामकरणावरुनही वाद पेटला आहे.पहिली चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनी काढल्यानंतर त्यात श्रावणी नाव आले.पण,दुसरी चिठ्ठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढल्यानंतर त्यात आदित्य नाव आले.पण, ही चिठ्ठी बाजूला ठेवण्यात आली.मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार टिपला गेला.शेजारीच उभे असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी ती चिठ्ठी मागे घ्यायला लावली.त्यानंतर दुसरी चिठ्ठी काढण्यात आली.त्यात विक्रम हे नाव आले.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या चिठ्ठीत कान्हा हे नाव आले.पण,आदित्य या नावाची चिठठी बाजूला ठेवल्यामुळे त्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावर जोरदार टीका केली आहे.ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, ‘आदित्यला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हे कोणताही आदित्य लपवू शकत नाहीत. तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचे सर्वांना माहीत आहे. त्याचे नाव कोणाला असेल किंवा नसेल फरक पडत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तरी फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी असाच तिरस्कार करावा. आदित्य अजून तळपेल.’
![]()









































































