Last Updated on 30 Nov 2024 7:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातल्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईत होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाल्यानंतर महायुती सरकारची सत्तास्थापनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्या चर्चांवर आता पडदा पडला आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे.
५ डिसेंबर रोजी मुंबईतल्या आझाद मैदान इथं संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीचा शपथविधी होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

महायुतीचे नेते खातेवाटपाबाबत निर्णय घेतील आणि केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल – चंद्रशेखर बावनकुळे
महायुतीचे नेते खातेवाटपाबाबत निर्णय घेतील आणि केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल असं बावनकुळे यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. भाजपाचे केंद्रीय निरीक्षक आल्यानंतर भाजपाचा विधीमंडळ पक्षनेता निवडला जाईल असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या ५ डिसेंबरला आझाद मैदान इथं मुख्यमंत्री पदासह महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री भाजपा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील – अजित पवार
महायुती सरकारचा शपविधी ५ डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले. विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं खापर मतदान यंत्रावर फोडलं जात आहे, अशी टीका करत मतदान यंत्राबद्दल तक्रार करणं योग्य नाही असं पवार म्हणाले. मतदान यंत्रात घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवला पाहिजे असंही पवार म्हणाले.









































































