Last Updated on 16 Oct 2022 5:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कामेरी येथील दि.बा.पाटील यांची अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवचरण उज्जैनकर यांनी दिली आहे.जळगाव जिल्ह्यातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्यावतीने रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी पन्हाळगडावर दुसरे अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलन होत आहे.
आजवर विविध विषयावर अनेक कथा कादंबऱ्या लिहून दि. बा. पाटील यांनी मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्य चळवळ वाढीसाठी त्यांनी अनेक साहित्य संमेलने आयोजित करून भरीव काम केले आहे.मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे अनेक पुरस्कार त्यांच्या आजवरच्या साहित्यकृतींना मिळाले आहेत.
त्यांच्या अध्यक्ष निवडीमुळे जिल्ह्याच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.या संमेलनाचे उद्घाटन भारताचे माजी परराष्ट्र सचिव व ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार असून पन्हाळ्याचे एन. के. भोसले स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप, कॅप्टन गणपतराव घोडके, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. प्रतिमा इंगोले, संतोष कुमार बजाज, पद्मश्री नीलिमाताई मिश्रा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश तराळ यांची उपस्थिती आहे. अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे आजवरच्या माझ्या साहित्य क्षेत्रातील प्रवासाला योग्य न्याय मिळाला आहे. यामुळे मराठी साहित्याची सेवा करण्याची नवी उमेद घेवून यापुढील वाटचाल करणार असल्याची भावना दि.बा.पाटील यांनी व्यक्त केली.







































































