Last Updated on 24 Nov 2021 2:01 AM by Sanjay Patil/Adhorekhit
हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्ट्या जवळ आल्या की कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींबरोबर फिरायला जाण्याचे प्लॅन रंगतात. कधी ४ दिवसांची लहान ट्रीप तर कधी १० ते १२ दिवसांची मोठी ट्रीप करण्याचा बेत ठरतो. रोजच्या रुटीनमधून थोडा ब्रेक म्हणून अशी सहल नक्कीच आपल्याला रिफ्रेश करणारी ठरते. पण हिवाळ्यात प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. आता नेमकी कोणती आणि कशी काळजी घेतल्यास आपला प्रवास आणि एकूणच ट्रीप चांगली होऊ शकते पाहूयात…
✪ सर्वप्रथम तुम्ही कुठे जात आहात? त्या ठिकाणाच्या तापमानाची माहिती करून घ्या व त्यानुसार उबदार कपडेसोबत घेऊन जा. त्यासोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास शाल व गरम कपडे घ्या.
✪ थंडीत प्रवास करताना वाहनात बसून बसून शरीरातील सांधे आखडले जातात.त्यामुळे काही ठराविक वेळेने गाडीतून खाली उतरा.तसेच रेल्वे मध्ये असल्यास एखादी चक्कर मारून या जेणेकरून आपले स्नायू मोकळे होतील.
✪ सहली दरम्यान कोण कधी आजारी पडेल हे सांगता येत नाही. अशावेळी स्वत:सोबत ताप, अंगदुखी, खोकला, डोके दुखी सारख्या आजारांवर उपयुक्त काही गोळ्या तर सर्दीसाठी उपयुक्त बाम अशा वस्तू सोबत ठेवा. कारण एखाद्या नवीन ठिकाणी लगेच डॉक्टर गाठणे शक्य नसते. अशावेळी स्वत:जवळ असणाऱ्या औषधांचा उपयोग होतो.
✪ प्रवासात गार पाणी किंवा शीतपेये प्यायल्याने घसा खराब होण्याची शक्यता असते. तसेच बाहेर गेलो असल्याने तेलकट पदार्थही खाण्यात येतात. अशावेळी घसा दुखू नये यासाठी शक्यतो कोमट पाणी पीत राहा. ते शक्य नसल्यास चहा किंवा कॉफी घेतल्यानेही घशाला आराम मिळेल.
✪ तसेच थंडीच्या मोसमात बर्फाळ प्रदेशात स्नो फॉल पाहण्याचे आकर्षण असते. मात्र, अशा ठिकाणी जाण्यासाठी अधिक काळजी घ्यावी. बर्फावर जास्त काळ चालू नका. त्यामुळे स्नायू बधीर होऊन त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय प्रवास करताना कानावर गार वारे बसणार नाही याची काळजी घ्या. त्यानेही लगेचच सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते.
✪ हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते तर कधी आगही होते. काहींना खाजवल्यानंतर रक्त येते. त्यामुळे कोल्डक्रिम, तेल, लीपबाम यांसारख्या त्वचेला मऊ ठेवतील अशा गोष्टी सोबत ठेवा. त्याचा निश्चितच फायदा होईल.














































































